

पणजी : राज्यात 25 जूनपासून उसंत घेतलेला पाऊस पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता हवामान खात्याच्या वेध शाळेने व्यक्त केली आहे. तरीही राज्यातील धारबांदोडा, सांगे, वाळपई आणि फोंडा या भागात आतापर्यंतच्या पावसाने 1 हजार मि.मी.चा टप्पा पार केला आहे. मात्र पावसाच्या मधल्या उसंतीमुळे सरासरी तूट कायम असून, ती 13.1 टक्के आहे. येत्या आठवडाभरासाठी, मात्र जोरदार पावसाचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.
वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, मान्सून सुरू झाल्यापासून आतापर्यंत धारबांदोडा येथे सर्वाधिक 1278.6 मि.मी. पाऊस झाला आहे. याशिवाय सांगे येथे 1108.1, वाळपईत 1072 आणि फोंड्यात 1038.2 मि.मी. पाऊस झाला आहे. राज्यात 25 जुनपासून पावसाने काहीशी उसंत घेतली होती. आता तो पुन्हा वाढत आहे. गुरुवारपासून जोरदार पावसाचा ’यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. 24 तासांत 47.7 मि.मी. पावसाची नोंद झाली असून आत्तापर्यंत 989.9 मि.मी. पाऊस अपेक्षित पाऊस होता. तो 860 मि.मी. झाला आहे. मागील 24 तासांत धारबांदोडा येथे सर्वाधिक 128.3 मि.मी. तर सांगे येथे 103.2 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.