

पणजी : तामिळनाडू किनारपट्टीवर निर्माण झालेल्या ‘फेंगल’ चक्रीवादळामुळे 2 डिसेंबरपासून राज्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता निर्माण झाली आहे, असे हवामान खात्याच्या गोवा वेधशाळेने म्हटले आहे. यामुळे वार्याचा वेगही वाढू शकतो आणि तापमानात किंचित वाढही होऊ शकते, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेस आणि श्रीलंकेच्या उत्तरेस निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे रूपांतर फेंगल चक्रीवादळात झाले असून हे वादळ पूर्व किनारपट्टीवरून तामिळनाडू आणि पुद्दुचेरी भागातून पुढे आले आहे. यामुळे काही भागांत मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. येत्या दोन दिवसांत हे वादळ तामिळनाडू, दक्षिण आंध्र प्रदेश, केरळमार्गे अरबी समुद्रात करावतीकडे (लक्षद्वीप) घुसण्याची शक्यता आहे. याचा परिणाम कर्नाटक, दक्षिण महाराष्ट्र आणि गोव्यावर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे पूर्वेकडून आणि उत्तरेकडून वाहणार्या वार्यांचा वेग ताशी 60 ते 70 किलोमीटर होऊ शकतो. याबरोबरच पाऊस पडण्याची शक्यता वाढेल, असे हवामान खात्याच्या गोवा वेधशाळेने म्हटले आहे. यामुळे 2, 3 आणि 4 डिसेंबर दरम्यान राज्यात पावसाच्या सरी अनुभवास येऊ शकतात. यामुळे तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यता आहे.