मद्य, दागिने तस्करीसाठी रेल्वेचा वापर

मडगावचे कोकण रेल्वेस्थानक ठरतेय केंद्रबिंदू; गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटकात तस्करी
railway-used-for-liquor-and-jewelry-smuggling
मडगाव : बॅगेतून मद्य नेले जात असताना.Pudhari File Photo
Published on
Updated on

मडगाव : सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी वाहतूक, व्यवसायाच्या दृष्टिकोनातून इतर राज्यांना गोव्याशी जोडणारे प्रभावी साधन आणि राज्याच्या पर्यटन व्यवसायात मोलाची कामगिरी बजावणारे मडगावचे कोकण रेल्वेस्थानक आता आंतरराज्य तस्करीचे प्रभावी माध्यम बनले आहे. पिस्तुले, अमली पदार्थ आणि मानवी तस्करीनंतर आता मद्यआणि सोन्याच्या तस्करीचे मडगाव कोकण रेल्वे स्थानक केंद्रबिंदू बनले आहे. रेल्वेस्थानक परिसरातील मद्याच्या दुकानातून दररोज गुजरात, महाराष्ट्र आणि कर्नाटकात मद्याची तस्करी केली जात आहे आणि रेल्वेच्या माध्यमातून मुंबईवरून अवैधरित्या गोव्यात सोन्याची आयात केली जात आहे.

नुकतेच थिवी रेल्वे स्थानकावर एका संशयित इसमांकडून सुमारे 36 लाख रुपये रोकड पकडण्यात आली होती. आपण द्राक्षांचा व्यापारी आहे आणि ते पैसे द्राक्षांच्या विक्रीतून आले आहेत, असे भासवण्याचा त्याच्याकडून प्रयत्न झाला होता. त्याच दिवशी कोकण रेल्वे पोलिस ठाण्याचे तत्कालीन निरीक्षक सुनील गुडलर यांना भ्रष्टाचार विरोधी पथकाकडून, गोमांस वाहतूक प्रकरणात लाच स्वीकारल्याच्या आरोपाखाली पकडण्यात आले होते. त्या कारवाईवरून माजलेल्या गोंधळात, 36 लाख रुपयांच्या प्रकरणावर पडदा पडणार होता. मात्र दैनिक पुढारीने हा विषय लावून धरल्यामुळे, रकमेसकट पकडलेल्या त्या संशयिताविरोधात पोलिसांना तक्रार नोंदवावी लागली. त्या व्यक्तीची जामिनावर सुटका झाली असली तरीही न्यायालयाने दिलेल्या सूचनेप्रमाणे, पुरावे सादर करून ती रोकड त्याने आपल्या ताब्यात घेतलेली नाही. पोलिस चौकशीत ती रक्कम एका सराफी व्यावसायिकाची असून दागिन्यांवर लागणारा कर वाचवण्यासह काळया व्यवसायातील पैसा पुन्हा कायदेशीररित्या चलनात आणण्यासाठी सोन्याची तस्करी करण्याचा प्रकार बर्‍याच वर्षांपासून सुरू असल्याची माहिती उघड झाली आहे.

देशात सोन्याला झळाळी आली असून दागिन्यांचा आकडा आता लाखाला पोहोचत आलेला आहे. सोने खरेदीवर सरकारला कर द्यावा लागतो. सरकारी महसुलाला कात्री लावण्यासाठी थेट रोकड वापरून मुंबई आणि केरळमधून दागिने खरेदी केले जात आहेत. दीड महिन्यापूर्वी कोकण रेल्वे पोलिस उपनिरीक्षक विप्लव वस्त यांनी मोठ्या शिताफीने रेल्वे स्थानकावरून एका संशयितला ताब्यात घेतले होते. त्याच्याकडून सुमारे 20 पेक्षा जास्त तयार मंगळसूत्र जप्त करण्यात आली होती. सुरुवातीला ती बनावट मंगळसूत्रे असल्याचे भासवण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र चौकशीनंतर कोट्यवधी रुपयांच्या किमतीचे ती मंगळसूत्रे असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणाचा तपास अजूनही सुरू आहे.

मडगाव कोकण रेल्वे स्थानक प्लॅटफॉर्म क्रमांक सहा हा दारू तस्करीसाठी वापरला जात असल्याचे लोकांचे म्हणणे आहे. स्टेशन रोडवर उत्तर प्रदेश येथील कुख्यात गुंडांकडून चालवल्या जाणार्‍या बार तथा दारूच्या घाऊक विक्री दुकानातून कर्नाटक, महाराष्ट्र आणि गुजरातसह दारूबंदी असलेल्या प्रत्येक राज्यात दारू निर्यात केली जात आहे. राजकीय आशीर्वादामुळे संबंधितांवर कारवाई होत नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. दोघांपैकी एकावर खुनाचा गुन्हा नोंद आहे. नुकतेच या दोघांनी स्टेशन रोडवर हातोडे आणि लोखंडी सळीच्या सहाय्याने पोलिसांना माहिती देणार्‍या व्यक्तीला जबर मारहाण करून त्याला गंभीर जखमी केले होते.

इतर राज्यांच्या तुलनेत गोव्यात फार स्वस्तात दारू विकली जाते. नामांकित कंपन्यांच्या मद्यास महाराष्ट्र, कर्नाटकात मोठी मागणी आहे. दर दिवशी सकाळी लवकर आणि सायंकाळी उशिराने सुटणार्‍या रेल्वेतून मद्याचा मोठा साठा परराज्यांत पाठवला जातो. स्टेशन रोडवरील मद्य दुकानातील मद्याचे बॉक्स रेल्वेत चढवण्यासाठी प्रत्येकवेळी अनोळखी व्यक्तींचा वापर केला जातो. दारूने भरलेल्या बॅगा घेऊन हे तस्कर सर्वसामान्यांमध्ये मिसळतात. कोणत्या प्लॅटफॉर्मवर गाडी येणार हे त्यांना माहिती असल्यामुळे गाडी थांबताच मद्याच्या बाटल्सच्या बॅगा रेल्वेत टाकल्या जातात. विशेष म्हणजे या बाटल्या रेल्वेत तपासल्या जात नाहीत. आणि बॅगा पकडल्यास तो मी नव्हेच अशा अविर्भावात हात वर केले जातात. प्राप्त माहितीनुसार दारू तस्करीवरून दरदिवशी लाखो रुपयांची उलाढाल होत आहे.

प्रवेशद्वारावरील यंत्र नादुरुस्त

कोकण रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वारावरील प्रवाशांचे साहित्य तपासण्यासाठी बसवलेले यंत्र कायमचे नादुरुस्त झाले आहे. त्यासाठी नवीन यंत्रासाठीचा प्रस्ताव देण्यात आलेला आहे. रेल्वे स्थानकावर गोमांस व इतर वस्तू पाठवताना संबंधित रेल्वे स्थानकांनी पाठवणार्‍यांची सर्व माहिती घेणे आवश्यक होते. त्या वस्तू इथे पोहचल्यात, त्यात आमची कोणतीही चूक नाही, असे स्पष्टीकरण कोकण रेल्वेचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी बबन घाटगे यांनी दिले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news