

Purple Fest Goa CM Pramod Sawant
पणजी: दिव्यांग व्यक्तींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांच्या कलागुणांना व व्यक्तिमत्त्वाला वाव देण्यासाठी गोवा सरकारतर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या ‘पर्पल फेस्ट’ या वार्षिक समावेशक महोत्सवासाठी यंदा संयुक्त राष्ट्रसंघाची भागीदारी लाभणार आहे. हा महोत्सव येत्या ९ ते १२ ऑक्टोबर २०२५ दरम्यान गोव्यात मोठ्या उत्साहात पार पडणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज (दि. २६) पत्रकार परिषदेमध्ये दिली.
मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. यावेळी दिव्यांग कार्यालयाचे मंत्री सुभाष फळदेसाई, सचिव प्रसन्ना आचार्य, संचालक वर्षा नाईक, आयुक्त गुरुदास पावसकर उपस्थित होते.
मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, ‘पर्पल फेस्ट’ हा फक्त एक महोत्सव नाही, तर तो सामाजिक समावेश, समान संधी आणि सर्वसमावेशक विकासाचे प्रतीक आहे. दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या कौशल्यांनुसार संधी उपलब्ध करून देणे आणि समाजात त्यांचा आत्मसन्मान राखला जावा हा यामागील प्रमुख उद्देश आहे. पर्पल फेस्टचा यंदाचा टप्पा अधिक व्यापक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचणारा ठरणार आहे. सांस्कृतिक कार्यक्रम, संगीत, नृत्य, नाट्य, चित्रकला इत्यादी विविध कला प्रकारांमध्ये दिव्यांग कलाकारांना मंच मिळणार आहे. दिव्यांग व्यक्तींसाठीच्या हक्कांवर, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून येणाऱ्या सुविधा, शिक्षण व रोजगारातील संधी यावर चर्चा होणार आहे.
दिव्यांगांसाठी डिझाइन करण्यात आलेल्या नव्या तंत्रज्ञान व साधनांची प्रदर्शने यावेळी असतील. सर्वसामान्य नागरिक, संस्था, शाळा-कॉलेज यांच्यात दिव्यांगांसंबंधी संवेदनशीलता निर्माण करण्यासाठी विशेष उपक्रम राबविण्यात येतील. पर्पल फेस्ट २०२४ मध्ये देशभरातून आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरून हजारो लोकांनी सहभाग घेतला होता. विविध प्रदर्शनांपासून ते फॅशन शो, स्पर्धा आणि चर्चासत्रांपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याच यशस्वी परंपरेत आणखी भर घालत यंदाचा महोत्सवही अधिक भव्य स्वरूपात पार पडणार आहे.
गोवा सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या पुढाकाराने आणि विविध स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने हा महोत्सव पार पडतो. यंदा संयुक्त राष्ट्रसंघाच्या सहभागामुळे पर्पल फेस्टला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळणार असल्याची खात्री मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी व्यक्त केली.