पणजी : गोव्यात आयोजित तिसर्या आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट 2025 चे उद्घाटन गुरुवार, दि. 9 रोजी होणार आहे. केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री वीरेंद्र कुमार, राज्यमंत्री रामदास आठवले, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, गोव्याचे दिव्यांग खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई आदींच्या उपस्थितीत सायं. 4 वा. पणजीतील ईएसजीच्या सभागृहात हा उद्घाटन सोहळा होणार आहे.
या महोत्सवात जगभरातून सुमारे 10 हजार दिव्यांग व त्यांचे पालक तसेच विविध देशांचे प्रतिनिधी सहभागी होतील. ‘एकच ध्येय-सर्वांसाठी समावेशकता’ या थिमवर यंदाचा पर्पल महोत्सव होत असून दिव्यांगासाठी विविध स्पर्धा, उपक्रम, परिसंवाद, मार्गदर्शन आदींचा समावेश या चार दिवसीय महोत्सवात असेल. दिव्यांगजन सक्षमीकरण विभाग आणि गोवा सरकारच्या दिव्यांगजन आयुक्त कार्यालयाने केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय, भारत सरकार आणि संयुक्त राष्ट्रसंघाचे भारतातील कार्यालय यांच्या सहकार्याने या महोत्सवाचे आयोजन केले आहे तसेच युनोचे सहकार्य आयोजनास लाभले आहे. राज्य दिव्यांगजन आयुक्त गुरुप्रसाद पावसकर आणि त्याचे पथक महोत्सव यशस्वी करण्यासाठी कार्यरत असून दिव्यांग खात्याचे मंत्री फळदेसाई त्यांना मार्गदर्शन करत आहेत.