

पणजी ः विरोधी पक्षाचे नेते आम्हा सत्ताधारी आमदारांना नरकासुर संबोधून टीका करतात, मात्र त्या लोकांनी स्वतः आरशासमोर उभे राहावे, नेमके नरकासुर कोण हे त्यांना कळून येईल, असे प्रत्युत्तर सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री दिगंबर कामत यांनी विरोधकांना दिले आहे.
दिवाळी दिवशी फातोर्डा येथील एका कार्यक्रमात एकत्र आलेल्या काँग्रेस, आरजी व गोवा फॉरवर्ड पक्षाच्या नेत्यांनी सत्ताधारी 33 नरकासुरांना जाळायला हवे, असे विधान केले होते. याबाबत गुरुवारी पणजी येथे कामत यांनी वरील प्रतिक्रिया दिली. आम्ही नरकासुर नाही व देवही नाही, हे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केलेले आहे, आम्हाला नरकासुर म्हणणार्यांनी स्वतःला देव समजू नये, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटलेले आहे. त्याचबरोबर वीज मंत्री सुदिन ढवळीकर यांनी नरकासुर नेमके कोण ते जाहीरपणे सांगितले आहे. आपण एवढेच म्हणेन की आम्हाला नरकासुर म्हणणार्यांनी स्वतः आरशासमोर उभे राहावे. त्यांना कोण नरकासुर ते लगेच कळेल, असे मंत्री कामत म्हणाले.
विरोधक जरी एकत्र आले तरी दामबाब व मडगावचे लोक आपल्यासोबत आहेत. त्यामुळे विरोधकांच्या एकीचा काहीच परिणाम आपल्या विजयावर होणार नाही. दामबाब आणि मडगावकरांच्या आशीर्वादाने आपण गेली 35 वर्षे जिंकून येत आहे. आणि पुढील निवडणूकही जिंकणार आहे, असे मंत्री कामत म्हणाले.