

पेडणे : तुये इस्पितळ गोमेकॉ इस्पितळाशी संलग्न करून 26 जानेवारीपूर्वी सुरू करावे. तसेच या इस्पितळाच्या माध्यमातून सुमारे 80 टक्के रोजगार पेडणे तालुक्यातील युवा-युवतींना मिळावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा तुये इस्पितळ कृती समितीने रविवारी आयोजित केलेल्या जाहीर सभेतून दिला.
इस्पितळ परिसरात आयोजित सभेस पार्सेचे माजी सरपंच तथा काँग्रेस नेते देवेंद्र प्रभुदेसाई, मांद्रेचे माजी सरपंच तथा विद्यमान पंचायत सदस्य अॅड. अमित सावंत, माजी जिल्हा पंचायत सदस्य दीपक कलंगुटकर, मांद्रेचे माजी सरपंच तथा विद्यमान पंचायत सदस्य बाळा ऊर्फ प्रशांत नाईक, तुये हॉस्पिटल कृती समितीचे तुळशीदास राऊत, संजय राऊत, जोज लोबो, अॅड.प्रसाद शहापूरकर, सदानंद वायंगणकर, भास्कर नारुलकर, तुयेचे माजी सरपंच नीलेश कांदोळकर, व्यंकटेश नाईक, मिशन फॉर लोकलचे राजन कोरगावकर, संतोष मांद्रेकर, सुशांत मांद्रेकर उपस्थित होते. सभेस मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिकांसह युवक, महिला उपस्थित होत्या.
सभेत प्रमुख मुद्दे मांडण्यात आले, तसेच महत्त्वाचे ठराव घेण्याबरोबरच हे इस्पितळ बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळाशी संलग्न करताना गोमेकॉ इस्पितळात जे डॉक्टर, नर्स व इतर कर्मचारी आहेत, त्यांच्या बदल्या तुये इस्पितळात केल्या जाव्यात. पेडणे तालुक्यातील जनतेला जास्तीतजास्त रोजगार या माध्यमातून मिळावा, यासंबंधी सरकारने कायदा करावा, अशी ही मागणी यावेळी करण्यात आली. तुये इस्पितळ कृती समितीने पेडणे तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत जाऊन निवेदन सादर करताना संबंधीत सरपंचांनी कृती समितीसोबत असल्याचे आश्वासन दिले होते. मात्र सभेला एकही सरपंच का उपस्थित राहिला नाही? त्या सर्व सरपंचांना ग्रामसभेत ग्रामस्थांनी इस्पितळाविषयी प्रश्न विचारावेत, असा निर्णय सभेत घेण्यात आला.
तुये इस्पितळाची इमारत अजूनपर्यंत आरोग्य खात्याकडे सुपूर्द केली गेली नाही. ही इमारत साधन सुविधा महामंडळाच्या ताब्यात आहे. महामंडळाचे अध्यक्ष तथा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी इस्पितळ कधी सुरू करणार याची विधानसभेत माहिती द्यावी, असे आवाहन प्रवक्त्यांनी केले. इस्पितळाचे पूर्ण श्रेय माजी मुख्यमंत्री प्राचार्य लक्ष्मीकांत पार्सेकर यांनाच द्यावे लागेल असेही प्रवक्त्यांनी सांगितले.
देवेंद्र प्रभुदेसाई, अॅड. अमित सावंत, प्रशांत नाईक, पेडणेचे माजी नगराध्यक्ष डॉ. वासुदेव देशप्रभू, आप नेते शिंगणापूरकर, भारत बागकर, पेडणे नागरिक समितीचे सदानंद वायंगणकर, सुशांत मांजरेकर, संतोष मांद्रेकर, तुयेचे माजी सरपंच नीलेश कांदोळकर, स्नेहा नाईक, भास्कर नारुलकर, व्यंकटेश नाईक, संजय राऊत, तुळशीदास राऊत, अॅड. प्रसाद शहापूरकर, राजन कोरगावकर यांची यावेळी भाषणे झाली.