

पणजी ः विरोधकांनी स्वतःला देव समजू नये, आम्ही तर स्वतःला जनतेचे सेवक समजतो. विरोधकांना स्वतः देव असल्याचा भ्रम झालेला असेल, तर तो भ्रम लोकच उतरवतील. कारण शेवटी जनता सर्वेसर्वा आहे. आम्ही जनतेचे सेवक असल्यामुळे जनतेला अपेक्षित असलेली कामे करत आहोत, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
काँग्रेस, गोवा फॉरवर्ड व आरजी पक्षाच्या नेत्यांनी रविवारी (दि.19) फातोर्डा येथे आयोजित एका कार्यक्रमात आम्ही 33 नरकासुरांना जाळण्यासाठी एकत्र आलो आहोत, असे विधान केले होते. सत्ताधारी पक्षाकडे 33 आमदारांचा पाठिंबा आहे. त्यामुळे ही उपरोधिक टीका विरोधकांनी केली होती. या विधानावरून सत्ताधारी पक्षाचे नेते आक्रमक झाले आहेत. मंगळवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे पणजीत एका कार्यक्रमाला आले असता पत्रकारांनी विरोधकांच्या त्या विधानाबद्दल त्यांना विचारले असता, त्यांनी वरील प्रतिक्रिया दिली.
विरोधक स्वतःला देव समजत असावेत, मात्र त्यांनी देव समजण्याच्या भ्रमात राहू नये. आम्ही जनतेचे सेवक म्हणून लोकोपयोगी कामे करत आहोत, लोकांच्या मागण्या मान्य करण्याचे निर्णय घेत आहोत, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले.
नरकासुर कोण आणि देव कोण हे लोकांना चांगले माहित आहे. निवडणुकीत ते लोकच दाखवून देतील. आम्ही मात्र स्वतःला देव समजत नाही, आम्ही जनतेचे सेवक समजून इमाने-इतबारे काम करत आहोत. शेवटी लोकांचे हित महत्त्वाचे असते. कोण लोकांचे हित करतोय व करणार हे लोकांना माहित आहे. विरोधक एकत्र आले तरी आम्हांला काहीही फरक पडणार नाही, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले.