

फोंडा : पुढारी वृत्तसेवा
सर्व घटकांच्या कल्याणासाठी भाजप सरकार कार्यरत असून 'माझे घर' ही योजना सरकारने सुरू केली असली तरी काही लोक या योजनेच्या विरोधात न्यायालयात गेले आहेत. ते न्यायालयात गेले तरी कोणताही फरक पडत नाही, लोकांना त्यांचा हक्क मिळवून देणारच, अशी ग्वाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी फोंड्यात बोलताना दिली.
फोंड्यातील राजीव गांधी कला मंदिरात मंगळवारी गृह आधार योजनेतील लाभार्थ्यांना मार्गदर्शन कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. सावंत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सहकार मंत्री सुभाष शिरोडकर, फोंडा नगराध्यक्ष विरेंद्र ढवळीकर, कला मंदिरचे अध्यक्ष रितेश नाईक, जिल्हा पंचायत सदस्य गौरी शिरोडकर तसेच महिला बाल विकास खात्याच्या संचालक ज्योती देसाई, पंचायत संचालक महादेव आरोंदेकर व इतर पंच नगरसेवक उपस्थित होते.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले की, सरकारने कमकुवत घटकांच्या उत्कर्षासाठी भरीव कार्य केले आहे. गृह आधार तसेच इतर योजनांचा लाभगोमंतकीयांना मिळत आहे, मात्र काहींच्या निष्काळजीपणामुळे लाभाचे पैसे येत नाहीत त्यासाठी अशा लोकंना मार्गदर्शन करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला असून त्याचा लाभघ्या, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. सूत्रसंचालन श्रुती हजारे यांनी ज्योती देसाई यांनी स्वागत तर स्वाती प्रभू यांनी आभार मानले.
फाईल्स वेळेवर हातावेगळ्या करा
सहकारमंत्री सुभाष शिरोडकर म्हणाले की, प्रशासन प्रभावी करण्यासाठी प्रत्येक खात्यातील अधिकाऱ्यांनी वेळेवर फाईल्स हातावेगळ्या कराव्या. सरकारी नोकरांना जसा वेळेवर पगार होतो तसा गृह आधारचे पैसे वेळेवर मिळण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी अतिरिक्त पन्नास कोटी रुपये निर्धारित करावे, अशी सूचना शिरोडकर यांनी करताच मुख्यमंत्र्यांनी ती मान्य केली.
दर १० तारखेला लाभार्थीना पैसे मिळतील
राज्य सरकारच्या विविध लाभार्थीना दर महिन्याच्या १० तारखेला पैसे त्यांच्या बँक खात्यात जमा होतील अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. अशा योजनेतील पैशांसाठी लाभार्थीना ताटकळत राहता कामा नये म्हणून ही योजना केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.