पणजी : पणजीचे स्मार्ट सिटी म्हणून काम करताना अनेक जण दर दिवशी टीका करत होते, माध्यमांना बोलावून ही टीका होत होती. मात्र, आता स्मार्ट सिटीची कामे पूर्ण झाली असून पणजी स्मार्ट झाली आहे. त्यामुळे टीका करणाऱ्यांनी पणजीत फिरून पाहावे व पुन्हा माध्यमांशी बोलावे, अशी सूचना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली.
मिरामार येथे शुक्रवारी स्मार्ट सिटीअंतर्गत जिवोर्फे स्थापन केलेल्या इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशनचे उद्घाटन केल्यानंतर मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी पणजीचे आमदार तथा महसूल मंत्री बाबुश मोन्सेरात, महापौर रोहित मोन्सेरात, स्मार्ट सिटीचे प्रमुख संदीप जंकीस व इतर उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, स्मार्ट सिटीची कामे करताना अनेक अडचणी आल्या. त्यावेळी वारंवार विरोधक टीका करत होते. मात्र, आता स्मार्ट सिटीची कामे पूर्ण होऊन पणजी चकाचक झाल्यानंतर कोणीही काही बोलत नाही, जशी टीका केली होती; तशी तशी आता पाहणी करून बोलावे. कामे न करता सत्ता भोगलेल्यांनी काम करणाऱ्या सरकारवर नाहक टीका करणे बंद करावी, अशी सूचना डॉ. सावंत यांनी केली.
मिरामार येथील चार्जिंग सेंटरमध्ये चार चाकी चार वाहने एकाचवेळी चार्जिंग करण्याची सोय आहे. गोव्यासह अशी सेंटर स्थापन केली जातील. पणजी परिसरात १८ सेंटर स्थापन झाली आहेत. त्याच्या माध्यमातून गेल्या महिनाभरात ५ लाख किलो मीटर वाहने चालली व त्यामुळे ३५ टन कार्बन कमी होऊन प्रदूषण कमी झाले. ही चांगली बाब असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
स्मार्ट सिटी पणजीतील लोकार्पण झालेले प्रकल्प
मच्छीमारांसाठी जेटी विस्तार, रो-रो फेरी धक्का रुंदीकरण, मिरामार येथील ईव्ही चार्जिंग स्टेशन, स्मार्ट सिटी मुख्यालय आणि सभागृह, पादचारी पाऊलवाट, पणजी शहरासाठी एससीडीए सह २४७ पाणीपुरवठ्याचे उद्घाटन करण्यात आले.