

डिचोली : भाजप हा केवळ राजकीय पक्ष नसून मानवी जीवन समृद्ध करण्यासाठी व प्रत्येक घरांत समृद्धीसाठी कार्यरत असणारा एक सामाजिक दुवा आहे. याच भावनेने भाजप साखळी मंडळ समिती व कार्यकर्त्यांच्या सहभागातून मतदारसंघातील तीन कुटुंबांना पक्की घरे बांधून निवारा देण्यात आला आहे. या तीन कुटुंबीयांची गणेश चतुर्थीपूर्वी स्वप्नपूर्ती झाली आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी साखळी येथे केले.
मुसळधार पावसात साखळी व हरवळे भागांत तीन घरे जमीनदोस्त झाल्याने कुटुंबीयांचा निवारा हरपला होता. भाजपच्या साखळी मतदारसंघ मंडळ समिती व कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने या तिन्ही घरांची पुनर्बांधणी करून गणेश चतुर्थीपूर्वी त्या कुटुंबीयांचा गृहप्रवेश करण्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्री डॉ. सावंत बोलत होते. यावेळी मंडळ अध्यक्ष रामा नाईक, सरपंच गौरवी नाईक, साईमा गावडे, सिद्धी प्रभू, आनंद काणेकर, दयानंद बोर्येकर,सुभाष फोंडेकर आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, सरकारने म्हजें घर ही योजना आखून अनेक कुटुंबांना दिलासा देण्याचे काम केले आहे.
मुख्यमंत्र्यांचा संकल्प होतोय यशस्वी...
यावेळी गौरवी नाईक व रामा नाईक यांनी मुख्यमंत्र्यांनी गरजूंना निवारा देण्यासाठी पाऊल खर्या अर्थाने उपयुक्त आहे. प्रत्येक घरांत समृद्धी आणणे हा मुख्यमंत्र्यांचा संकल्प यशस्वी होताना दिसत असल्याचेही ते म्हणाले.
मुख्यमंत्र्यांकडून चतुर्थी भेट : आमोणकर
म्हजें घर योजनेमुळे मुरगावातील अनेक घरे कायदेशीर होणार आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ही गणेश चतुर्थीची भेट दिली आहे. मुरगावातील जनतेकडून मुख्यमंत्र्यांचे आभार मानत असल्याचे आमदार संकल्प आमोणकर यांनी सांगितले.