

पणजी : पुढारी वृत्तसेवा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कणखर नेतृत्वामुळे देश बलशाली बनलेला आहे. अनेक राज्ये विकसित झाली आहेत. गोव्यातील भरीव विकासकामांमुळे गोवेकर भाजप सोबत आहेत. त्यामुळे गोवा विधानसभेच्या येत्या निवडणुकीसोबतच लोकसभेची निवडणुकही भाजप निश्चितपणे जिंकेल, असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला.
ताळगाव येथील भाजप कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना डॉ. सावंत म्हणाले की, नितीन नवीन हे युवा मोर्चाचे सरचिटणीस होते, तेव्हापासून त्यांनी पक्षासाठी सक्रीयपणे काम केले आहे. त्यामुळे त्यांना आज उच्च पद प्राप्त झाले. तळागळातील एक कार्यकर्ता जगातील सर्वात मोठ्या पक्षाचा अध्यक्ष बनला असून हे भाजपमध्येच शक्य आहे. जिल्हा पंचायत निवडणुका भाजपने जिंकल्या आहेत.
पणजी महापालिकेची निवडणूक, पालिका निवडणूक, फोंडा पोटनिवडणूक आणि पंचायत निवडणुकही भाजप जिकणार आहे. अंत्योदय, सर्वोदय आणि ग्रामोद्योग तत्त्वांवर भाजप काम करत असून तळागाळातील लोकांच्या विकासासाठी केलेल्या कामाची पावती मतदार देत असल्याचे डॉ. सावंत म्हणाले. बाहेरच्या लोकांची गर्दी कमी करण्यासाठी गोव्यातील युवकांना कौशल्य प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगारासाठी सक्षम केले जात आहे. त्यामुळे बाहेरील लोंढे कमी होत आहेत.
गोव्यातील आदिवासी समाजाला एसटीचा दर्जा भाजपच्या सरकारने मनोहर पर्रीकर यांच्या काळामध्ये दिला होता. त्यांच्यासाठी विविध योजनाही सुरु केल्या आहेत. त्यामुळे विरोधकांनी कितीही अपप्रचार केला तरीही एसटी समाज भाजप सोबतच राहणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. दामू नाईक म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाजपसाठी युनिक सेलिंग पॉईंट (युसीपी) आहेत.
देशात युवकांची संख्या जास्त असल्याने पक्षाने राष्ट्रीय अध्यक्ष युवक दिला आहे. मंडळ अध्यक्ष ३५ वर्षांखालील केले आहेत. हे भाजपच करु शकतो. भारताला विश्वगुरू करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी जे प्रयत्न सुरू केले आहेत त्यांच्यामागे करोडो भाजप कार्यकत्यांचे पाठबळ असल्याचे सांगून पक्षाचे निष्ठेने काम करा योग्य वेळी योग्य पद मिळेल असे सांगून २०२७मध्ये २७ जागा भाजप जिंकून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेट देणार असल्याचेही नाईक म्हणाले.
केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक म्हणाले, राज्य आणि केंद्र सरकारने केलेल्या योजना आणि केलेल्या विकासाच्या माध्यमातूनच भाजपला विविध ठिकाणी यश मिळत असल्याचे सांगून ज्या राज्यात भाजपला संधी नव्हती. तेथेही भाजप यश मिळवत असल्याचे सांगितले. देशाच्या आणि राज्याच्या विकासासाठी भाजपला पुन्हा सत्तेवर आणणे गरजेचे असल्याचे सांगितले.
आरोग्यमंत्री विश्वजित राणे म्हणाले, राज्यातील खाणी विरोधकांनी बंद पाडल्यामुळे लोकांचे हाल झाले. आर्थिक संकट आले तरी सरकारने लाडली लक्ष्मी, गृह आधार सारख्या योजना सुरू ठेवल्याचे सांगून विरोधकांना केवळ टीका करता येते. काम काहीच होत नसल्याचे राणे म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः ला सामान्य कार्यकर्ते समजतात आणि त्याच भावनेने सगळ्यांनी काम करावे, असे मंत्री राणे म्हणाले सूत्रसंचालन प्रदेश सरचिटणीस
नितीन नवीन पक्षाचे बिग बॉस
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नितीन नवीन यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर ते आपले बॉस असल्याचे म्हटले होते. नितीन नवीन हे भाजपच्या करोड कार्यकत्यांचे बिग बॉस आहेत, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगताच सभागृहामध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला.
तानावडे यांचे अभिनंदन
राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे याचा शनिवारी वाढदिवस होता. त्यामिमित्त नितीन नवीन यांच्या हस्ते त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले.