

पणजी : पुढारी वृत्तसेवा
राज्यात गेल्या १५ वर्षांत सलग सत्तेच्या माध्यमातून झालेले परिवर्तन हे कार्यकर्त्यांच्या निःस्वार्थ कष्टांचे फलित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'यस, वुई विल डू इट' या संकल्पसह २०२७ मध्ये पुन्हा गोव्यात डबल इंजिन सरकार आणणार, असा निर्धार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून तेरा वर्षे व भारताचे पंतप्रधान म्हणून १२ वर्षे अशी एकूण २५ वर्षे जनसेवा पूर्ण केल्याबद्दल बुधवारी गोव्यात सेवा ज्योती यात्रेचे आयोजन करण्यात आले. प्रत्येक मतदारसंघातून स्थानिक आमदार व नेत्यांसह कार्यकर्त्यांच्या दुचाकी रॅली जिल्ह्याच्या ठिकाणी पोहोचल्या.
त्यानंतर म्हापसा (उत्तर गोवा), मडगाव (दक्षिण गोवा) व केपे, (कुशावती जिल्हा) येथे भव्य कार्यक्रम झाले. तिथे भाजपचे आमदार, मंत्री व नेत्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. साखळी येथे सेवा ज्योती यात्रेचा प्रारंभ केल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हापसा येथे उपस्थित राहिले.
मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले की, स्वयंपूर्ण गोव्याचा संकल्प बळकट करत विकसित भारताच्या उभारणीत योगदान देणे हे या यात्रेचे उद्दिष्ट आहे. सेवा आणि जनकल्याणाच्या भावनेतून पुढील वाटचाल करण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
सेवा ज्योती यात्रेच्या माध्यमातून सेवा, समर्पण आणि गरीब कल्याणाचा संदेश घराघरात पोहोचविण्यासोबतच स्वयंपूर्ण गोव्याच्या संकल्पाला अधिक बळ देण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नमूद केले.