

पणजी : पुढारी वृत्तसेवा
पर्वरी येथे उभारण्यात आलेला सहापदरी नवीन उड्डाणपूल आणि अटलसेतू दरम्यान होणारी वाहतूक कोंडी आणि अपघात टाळण्यासाठी सरकारच्या वतीने उपाययोजना करण्यात येत आहेत. पणजीहून पर्वरी उड्डाणपुलावर जाण्यासाठी, तसेच अटल सेतूवरून पर्वरी प्रवेश करण्यासाठी मार्गिका तयार केलेल्या आहेत. मात्र, हे सोयीस्कर होण्याऐवजी गोंधळ होत असल्याने वाहतूक कोंडी होत आहे.
पणजीहून म्हापशाच्या दिशेने उड्डाणपुलावरून जाणाऱ्यांसाठी मार्गिका खुली केली आहे. परंतु, त्याची रचना पाहून वाहनचालकांचा गोंधळ होतो. वाहन पुढे न्यावे की माघारी, या विचारात वाहनचालक पडत असल्याने अटल सेतू एक्झिट पॉईंटवर वाहतूक कोंडी होते. येथे लावलेले सूचना फलक नेमके कोणत्या मार्गिकांसाठी लावले हे समजण्यास कठीण जात आहे. त्यामुळे सर्व्हिस रस्त्यावरही वाहने अडकून पडत आहेत.
उड्डाणपुलावरून जाणाऱ्या वाहनांसाठी ताशी ६५ किलोमीटरची वेगमर्यादा आहे. त्याचे उल्लंघन होत असल्याने येथे स्पीड तपासणीसाठी कॅमेरे लावले आहेत. त्याबरोबरच वाहतूक पोलिसही लक्ष ठेवून आहेत. यामुळे मागील १० दिवसांत ५८० वाहनांनी वेगमर्यादा ओलांडल्याचे निदर्शनास आले. शुक्रवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारासही गणेश विसर्जन करून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनाला अपघात घडला. वाहनाची दुभाजकाला धडक बसल्याने मोठे नुकसान झाले. मात्र, त्यातील कोणासही इजा झाली नाही.
वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्पीड कॅमेऱ्यांच्या मदतीने या मार्गावरील वाहनांच्या वेगावर लक्ष ठेवले जात आहे. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाते. पुलाच्या दोन्ही टोकांवर वाहतूक पोलिस तैनात आहेत. तरीही वाहनचालकांकडून वेगमर्यादेचे उल्लंघन करण्याचे थांबलेले नाही.
दरम्यान, म्हापशाकडून येणाऱ्या वाहनांना पर्वरीत जाण्यासाठी अटल सेतूम जवळ एक्झिट पॉईंट अद्यापही दिलेला नाही. त्यामुळे पर्वरीवासीही त्यापासून वंचित आहेत. परंतु, सरकारने सोमवारी घेतलेल्या बैठकीनंतर सात दिवसांत योग्य उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे वाहनचालक अजूनही सरकारी उपाययोजनांची प्रतीक्षा करत आहे.
पर्वरी उड्डाणपुलावर तातडीच्या सुधारणा
केंद्रीय महामार्ग मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने या आठवड्यात गोव्याला भेट देऊन पर्वरीतील सहापदरी उन्नत मार्ग प्रकल्पाची पाहणी केली. यावेळी गोवा सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून तातडीच्या सुधारणा करण्याचे आदेश देण्यात आले.
साबांखाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी काही दिवसांपूर्वी ६४१ कोटी रुपयांच्या पर्वरी उन्नत मार्गाचे उद्घाटन केले होते. त्यानंतर उड्डाणपुलावरील काही उणिवा निदर्शनास आल्यानंतर केंद्रीय महामार्ग विभागाने त्याची दखल घेतली आहे.
पोलिसांकडून जागृती
वाहनांचे होणारे अपघात टाळण्यासाठी वाहतूक पोलिस मुख्यालय पणजी, पोलिस निरीक्षक वाहतूक आणि पर्वरी वाहतूक वॉर्डन सीताकांत कामत यांच्याकडून ओ-कोकेरो सर्कल येथे वाहतूक नियमांचे पालन करत अपघात टाळण्यासाठी जागृती केली जात आहे. जीवन अमूल्य असल्याने वाहन चालवताना मोबाईल फोनचा वापर टाळा, रस्त्यावर नजर ठेवून वाहने चालवा, असे आवाहन केले जात आहे.