

पणजी : पुढारी वृत्तसेवा
पर्वरीतील सहापदरी उड्डाणपुलावरून पणजीच्या दिशेने जाणारी निर्गमन मार्गिका अखेर खुली करण्यात आली आहे. मात्र, पणजीहून गिरीकडे जाणारी मार्गिका अद्याप बंद असल्याने पत्रादेवीच्या दिशेने जाणाऱ्या वाहनचालकांची अडचण कायम आहे. पर्वरीतील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग ६६ वर सहापदरी उड्डाणपूल उभारण्यात आला.
९ सप्टेंबर रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन झाले. त्यानंतर ११ सप्टेंबरला सार्वजनिक बांधकाममंत्री दिगंबर कामत यांच्या उपस्थितीत पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. मात्र, २४ तासांत झालेल्या अपघातांनंतर दुचाकींना पुलावर प्रवेश बंद करण्यात आला.
तसेच पर्वरी अटलसेतूच्या एक्झिट पॉईंटजवळ नव्या उड्डाणपुलावर ये-जा करण्यासाठी आगमन व निर्गमन मार्गिका बंद करण्यात आल्या. त्यामुळे जुन्या मार्गावरील वाहतुकीवर अपेक्षित परिणाम झाला नाही. उलट वाहतूक कोंडी वाढल्याने नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात आला.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत, आयआयएम नागपूरचे अभियंता व अधिकारी आणि वाहतूक पोलिस यांची संयुक्त बैठक घेण्यात आली.
त्यात योग्य उपाययोजना करून पुलावरील मार्गिका खुल्या करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार अटलसेतूहून येणाऱ्या वाहनांना पर्वरीसह कळंगुट आणि कांदोळीच्या दिशेने जाने सोयीचे झाले. मात्र, वाहतूक कोंडीचे प्रकार सुरूच आहेत.
तरीही गोंधळ कायम:
नव्या पुलावरील आगमन व निर्गमन मार्गिका खुल्या करण्यात आल्या असल्या तरी त्यांचा वापर कसा आणि कोणी करावा, हे फलकांवरून स्पष्ट होत नाही. डावीकडे वळण्याची खूण दिल्यानंतर काही अंतरावर कोणत्या वाहनांनी डावीकडे वळावे, याबाबत वेगळी सूचना आहे. जुन्या मार्गाच्या बाजूला दुचाकींना प्रवेशबंदीचा फलक आहे. त्यामुळे वाहनचालकांचा गोंधळ उडत आहे. सकाळी आणि संध्याकाळी वाहतूक कोंडीही सुरूच आहे.