

पणजी : पुढारी वृत्तसेवा
गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर पर्वरी येथील नुकत्याच सुरू करण्यात आलेल्या उन्नत मार्गावरील (एलिव्हेटेड कॉरिडोर) महत्त्वाच्या प्रवेश आणि निर्गमनाच्या मर्जर लेन बंद करण्यात आल्याने सेवा रस्त्यावरील वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. त्यातच दुचाकींना उन्नत मार्गावर बंदी घातल्याने वाहनचालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
सरकारने या उन्नत मार्गाला सेवा रस्त्याशी जोडणाऱ्या जंक्शनचे अभियांत्रिकी नियोजन योग्य प्रकारे न केल्याचे नुकत्याच झालेल्या भीषण अपघातातून स्पष्ट झाले. पूल सुरू केल्यानंतर अवघ्या २४ तासांत हा अपघात झाला. बांधकाममंत्र्यांनी याचे खापर भरधाव वेगाने वाहने चालवल्यामुळे अपघात झाल्याचे सांगितले असले तरी जंक्शनमधील त्रुटींवर भाष्य केलेले नाही.
सुरक्षेच्या कारणास्तव या लेन बंद करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे घाईगडबडीने पूल खुला करून सरकारने काय साध्य केले, असा प्रश्न वाहनचालक उपस्थित करत आहेत.
सुमारे साडेसहाशे कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेला ५.१५ किलोमीटरचा हा उन्नत मार्ग केवळ चारचाकी वाहनांसाठीच आहे का, असा सवाल दुचाकीचालक करत आहेत.
पर्वरी मार्गावर मोठ्या प्रमाणात दुचाकी वाहने धावत असताना त्यांनाच उन्नत मार्गावर बंदी घातल्याने वाहतुकीची कोंडी पुन्हा कायम राहण्याची शक्यता आहे. हा पूल सामान्य लोकांसाठी नसून केवळ चारचाकी वाहनधारकांसाठी आहे, असा प्रश्न विचारला जात आहे.
जीवघेण्या अपघातानंतर प्रशासनाने सुरक्षेला प्राधान्य देत प्रवेश मार्गिका बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या निर्णयामुळे पर्वरीमधील आधीच गुंतागुंतीचे झालेले वाहतुकीचे जाळे आणखी विस्कळीत झाले आहे. नव्या पुलाचा पूर्ण क्षमतेने वापर करून खालील रस्त्यावरील वाहतूक कमी करण्यासाठी सुरक्षित पर्यायी मर्जर लेन किंवा नियंत्रित प्रवेश-निर्गमन व्यवस्था तातडीने करावी, अशी मागणी वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
जुन्या मांडवी पुलावरून पणजीच्या दिशेने येणारी वाहने आणि बसेस म्हापासाकडे जाण्यासाठी नव्या उन्नत मार्गावर प्रवेश करू शकत नाहीत. जुन्या रस्त्याला नव्या पुलाशी जोडणाऱ्या महत्त्वाच्या प्रवेश रॅम्पना पूर्णपणे अडथळा निर्माण करण्यात आल्याने ही वाहतूक नव्या मार्गावर वळवण्याचा पर्याय सध्या उपलब्ध नाही. त्यामुळे पणजीहून म्हापासाकडे जाणाऱ्या वाहनांना पुन्हा जुन्या रस्त्याचा वापर करावा लागत आहे. विशेषतः गर्दीच्या वेळेत या मार्गावर वाहनांची संख्या वाढल्याने वाहतूक कोंडीची समस्या अधिक गंभीर होत आहे.