Goa news | कुडचडे-सांगेत 'आंधळ दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय'

विकासकामांत समन्वयाचा अभाव; नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त
Goa news | कुडचडे-सांगेत 'आंधळ दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय'
Published on
Updated on

सांगे :कुडचडे ते सांगे कोर्ट या मार्गावर सुरू असलेल्या विकासकामांमध्ये विविध सरकारी खात्यांमध्ये समन्वयाचा अभाव दिसून येत असून, त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. 'आंधळ दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय' अशी परिस्थिती येथे निर्माण झाल्याची प्रतिक्रिया स्थानिकांकडून व्यक्त होत आहे.

गेल्या तीन वर्षांपासून या भागात रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरण काम सुरू आहे. यासाठी मुख्य रस्त्यालगतची जमीन सरकारने यापूर्वीच संपादित केली होती. मात्र, सुमारे दीड वर्षांपूर्वी वीज खात्याने रस्त्याच्या कडेला लोखंडी पोल उभारून रस्त्यावरील दिवे बसविले. सध्या सुरू असलेल्या रुंदीकरणाच्या कामामुळे यापैकी सुमारे ९० टक्के पोल नव्या रस्त्याच्या हद्दीत आले आहेत. परिणामी, हे पोल पुन्हा हलविण्याची वेळ आली असून, यामुळे सरकारी निधीवर अतिरिक्त भार पडणार आहे.

सार्वजनिक बांधकाम खात्याने रस्त्याचे रुंदीकरण होणार असल्याची पूर्वकल्पना वीज खात्याला दिली असती, तर पोल योग्य ठिकाणी उभारता आले असते, अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत. तसेच, संबंधित खात्यांमध्ये आवश्यक समन्वयाचा अभाव असल्याचेही स्पष्ट होत आहे.

विशेष म्हणजे, या मार्गावर भूमिगत वीजवाहिन्यांची कामेही करण्यात आली असून त्याचे वितरण बॉक्स (डिस्ट्रिब्युशन बॉक्स) देखील नव्या रस्त्याच्या हद्दीत आले आहेत. त्यामुळे परिस्थिती आणखी गुंतागुंतीची झाली आहे.

सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंते या मार्गावरून नियमित प्रवास करत असूनही त्यांनी वीज खात्याला खांब उभारण्यास कशी परवानगी दिली, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. अशा प्रकारामुळे सरकारी निधीचा अपव्यय होत असल्याची टीकाही होत आहे. भविष्यात अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी रस्त्यालगत इतर खात्यांची कामे करताना सार्वजनिक बांधकाम खात्याचा 'ना हरकत दाखला' घेणे बंधनकारक करावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत यांनी या प्रकरणात लक्ष घालून संबंधित खात्यांना योग्य त्या सूचना द्याव्यात, अशी मागणीही पुढे येत आहे.

एकाच वेळी अनेक कामे

दरम्यान, या रस्त्यावर एकाच वेळी विविध कामे सुरू असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. एका बाजूने सीवरेज पाईपलाईन टाकण्याचे काम, दुसऱ्या बाजूने वीज केबल टाकण्याचे काम, तसेच रस्त्याचे रुंदीकरण आणि डांबरीकरण यामुळे संपूर्ण मार्ग ओबडधोबड बनला आहे. त्यामुळे वाहतुकीस धोका निर्माण झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news