

पणजी : पुढारी वृत्तसेवा
पुरुषांची मत्तेदारी मानल्या जाणाऱ्या सार्वजनिक वाहतूक क्षेत्रात पाऊल टाकत वन-म्हावलिंगे (डिचोली) येथील पूजा वाइंगणकर यांनी इतिहास रचला आहे. कदंब परिवहन महामंडळाच्या पहिल्या महिला बसचालक होण्याचा बहुमान त्यांनी मिळवला असून, प्रत्यक्ष कामालाही सुरुवात केली आहे.
बालपणीच वडिलांचे छत्र हरवले. आईने कष्टाने शिक्षण दिले. या परिस्थितीची जाणीव ठेवून जिद्द, आत्मविश्वास आणि संघर्ष्याच्या बळावर स्वावलंबी होण्याचा निर्णय घेतल्याचे पूजा यांनी सांगितले.
एका सर्वसामान्य कुटुंबातील मुलगी ते बसचालक हा प्रवास उलगडताना त्या म्हणाल्या, आयुष्यात काही करायचे असेल, तर ते आत्मविश्वासाने करावे. लोक काय म्हणतील, याचा आपल्या कामावर परिणाम होऊ देऊ नये.
मुलगी म्हणून मागे न राहाता ठाम निर्णय घ्यावा, हा विचार मला सतत प्रोत्साहन देत होता. घरानजीक बहुराष्ट्रीय कंपनी असल्याने तेथे मोठ्या वाहनांची सतत ये-जा सुरू असायची. ही वाहने कशी चालवतात, याचे कुतूहल वाटायचे.
आपणही अशी वाहने चालवू शकतो, या आत्मविश्वासातून त्यांनी वर्षभर वाहन चालवण्याचे प्रशिक्षण घेतले आणि आवश्यक परवाना मिळवला. अवजड वाहन चालवण्याचा आत्मविश्वास आल्यानंतर त्यांनी मालवाहू टेम्पो बेळगाव आणि कोल्हापूरपर्यंत नेण्यास सुरुवात केली.
पहिल्यांदा घाटाच्या पायथ्याशी पोहोचल्यावर त्या काही वेळ थांबल्या; मात्र, नंतर आत्मघासाने घाटरस्त्यावरही वाहन चालू लागल्या. त्यानंतर वाहनचालक हाच व्यवसाय म्हणून निवडल्याचे त्यांनी सांगितले. कदंब महामंडळात महिला वाहकांसह अन्य पदांवर महिला कार्यरत आहेत; मात्र, महिला चालक नव्हत्या.
काही महिन्यांपूर्वी अर्ज केला. नंतर महामंडळाकडे प्राप्त झालेल्या एक हजार अर्जांमधून १०० जणांची चाचणीसाठी निवड झाली. त्यात आपण एकमेव महिला होते, असे पूजा यांनी सांगितले.
या प्रवासात आई आणि कुटुंबीयांची मोठी साथ लाभली. आईनेच सतत काम करण्यासाठी प्रोत्साहन दिले, असेही त्यांनी नमूद केले.
आपातकालीन परिस्थितीतही वाहन चालवणे उपयुक्त
मुली आणि महिलानी वाहन चालवण्यास शिकले पाहिजे. कोणावरही अवलंबून न राहण्यासाठी तसेच आपत्कालीन परिस्थितीत स्वतःच्या उपयोगासाठी वाहन चालवण्याचे कौशल्य महत्त्वाचे आहे. मुलगी असल्याचे दडपण न घेता ठाम निर्णय घेऊन आत्मविश्वासाने काम करावे, असा संदेश पूजा वाइंगणकर यांनी दिला.