

पणजी : राज्यात कॅश फॉर जॉब घोटाळा प्रकरणातील संशयित पूजा नाईक हिने दिलेल्या नावांची पोलिस यंत्रणा चौकशी करणार आहे. पोलिसांना माहिती पडताळून पाहू द्या व जर त्यात कोणी गुंतला असल्याचे आढळले तर त्यांना चौकशीसाठी बोलावले जाईल. पूजा नाईकने दिलेल्या जबानीबाबत पोलिसांकडून आढावा घेतला जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. पूजा हिला सोमवारी डिचोली पोलिस ठाण्यात बोलावून एक तास चौकशी केली व त्यानंतर पाठवण्यात आले.
या कॅश फॉर जॉब घोटाळ्यात पोलिसांनी योग्य प्रकारे तपास केलेला दिसत नाही. एका प्रकरणाबाबत मला माहिती आहे त्यामध्ये एक शिक्षक गुंतला होता मात्र त्याच्यावर कारवाई झाली नाही. आपल्या हायस्कूलमधील एक शिक्षक गुतंल्याचे समोर आल्यावर त्याला निलंबित करण्यात आले होते. पाल्यांना शिकवण्यासाठी पालकांना संघर्ष करावा लागतो तो जवळून मी पाहिला आहे. सरकारी नोकर्यांसाठी पैसे द्यावे लागत असतील तर त्या संबंधित मंत्री व अधिकार्यांविरुद्ध कठोर कारवाई व्हायला हवी ज्यामुळे यापुढे कोणीही असे प्रकार करण्यास धाडस करणार नाहीत, असे ढवळीकर म्हणाले.
माजी बांधकाममंत्री तथा आमदार निलेश काब्राल यांना पूजा नाईक हिने केलेल्या विधानासंदर्भात विचारले असता ते म्हणाले पूजा हिने नावे उघड करण्याचा इशारा दिला होता त्यामुळे तीच त्याचे उत्तर देऊ शकते. माझा या प्रकरणाशी काहीच संबंध नाही त्यामुळे मला कसे माहीत असणार असे त्यांनी स्पष्ट केले. माहितीची पडताळणी ः अधीक्षक गुप्ता पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता यांना संशयित पूजा नाईक हिच्या चौकशीसंदर्भात विचारले असता ते म्हणाले, तिने जी माहिती दिली आहे त्याची पडताळणी करण्यात येत आहे. या तपासणीत दिलेल्या नावाचा या घोटाळ्याशी संबंध असल्यास त्यांनाही बोलावले जाईल. याक्षणी तिने दिलेली माहिती उघड करणे योग्य होणार नाही. तिने केलेले आरोप गंभीर आहेत. त्यामुळे पुरावे कितपत आरोप सिद्ध करतात ते सुद्धा पाहावे लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
...तर कठोर कारवाई व्हावी
मंत्री ढवळीकर मुख्यमंत्र्यांनी कॅश फॉर जॉब घोटाळाप्रकरणी पूजा हिने केलेल्या स्फोटक विधानाची दखल घेत पोलिसांना चौकशीचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री याबाबत योग्य निर्णय घेतील. यामध्ये तिने केलेल्या आरोपात तथ्य असेल तर ते लोकांच्या जीवाशी खेळले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई व्हायलाच हवी. पूजा नाईक हिने अनेकांकडून पैसे घेतले आहेत व ते परत करणे शक्य नसल्याने त्यातून बाहेर पडण्यासाठी तिने हे स्फोटक विधान केले असावे. आपल्यावरील आरोप दुसर्यावर ढकलून कोणाला तरी लक्ष्य बनवण्याचा तिचा प्रयत्न असू शकतो, असे मंत्री सुदिन ढवळीकर म्हणाले.
पूजाला मागच्या दाराने पाठवले...
दरम्यान, संशयित पूजा नाईक हिने घोटाळ्यात गुंतलेल्या मंत्री, आयएएस अधिकारी व पीडब्ल्यूडी अधिकार्यांचा पर्दाफाश करण्याचा इशारा दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार, तिची काल रायबंदर येथील क्राईम ब्रँचमध्ये चार तास चौकशी करण्यात आली. तिने जी माहिती दिली आहे ती तपासण्यात येत आहे. तिच्याविरुद्ध डिचोली येथील पोलिस ठाण्यात गुन्हे नोंद असल्याने आज सकाळी या पोलिसांनी तिला चौकशीसाठी घरातून बोलावून आणले. सुमारे एक तास चौकशी केल्यानंतर तिला पोलिस ठाण्याच्या मागील दाराने पाठवण्यात आले. त्यामुळे तिला प्रश्न विचारण्यास हजर असलेल्या पत्रकारांचा भ्रमनिरास झाला.