

पणजी : पुढारी वृत्तसेवा गोव्यात जानेवारी महिन्यात होणाऱ्या तीन वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा व संरक्षणमंत्री राजनाथ सिंह गोव्यात येणार आहेत. २७जानेवारीपासून बेतुल येथे आयोजित इंडिया एनर्जी वीकसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार आहेत. या पार्श्वभूमीवर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
१६ जानेवारी रोजी बांबोळी येथील एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये होणाऱ्या पश्चिम विभाग स्तरावरील परिषदेसाठी गृहमंत्री अमित शहा गोव्यात येणार आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हे रविवारी ४ रोजी गोवा शिपयार्ड येथे आयोजित कार्यक्रमासाठी गोव्यात दाखल होणार आहेत.
वर्षाच्या पहिल्याच महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह गोव्यात येत आहेत. त्यामुळे गोवा शिपयार्ड, बांबोळी आणि त्यानंतर बेतुल ही ठिकाणे विशेषतः सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील ठरणार आहेत. नेत्यांच्या या दौऱ्यांमुळे वाहतूक नियोजन, बंदोबस्त, कार्यक्रम स्थळांची सुरक्षा, तसेच सामान्य नागरिकांच्या दैनंदिन हालचालींवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह ४ जानेवारी रोजी गोव्यात दाखल होणार असून, ५ जानेवारीला गोवा शिपयार्ड येथे आयोजित कार्यक्रमात ते सहभागी होतील.
संरक्षण क्षेत्राशी संबंधित हा कार्यक्रम असल्याने नौदल, केंद्रीय सुरक्षा यंत्रणा आणि राज्य पोलिसांनी संयुक्तपणे बंदोबस्ताची आखणी केली आहे. १६ जानेवारी रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे बांबोळी येथील हॉटेलमध्ये होणाऱ्या पश्चिम विभाग स्तरावरील कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमासाठी गोवा, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान आदी राज्यांतील मंत्री व वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. दक्षिण गोव्यातील बेतुल येथे २७ जानेवारी रोजी सुरु होणाऱ्या आंतरराष्ट्रीय इंडिया एनर्जी वीक या अत्यंत महत्त्वाच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाला देश-विदेशातील ऊर्जा क्षेत्रातील दिग्गज, परदेशी प्रतिनिधी, उद्योगपती आणि तज्ज्ञांची उपस्थिती अपेक्षित आहे