

पणजी : राज्यातील समुद्र किनाऱ्यांवरील स्वच्छतेसंदर्भात गेल्या दोन वर्षे अभ्यास करण्यात आला. यात अनेक समुद्रकिनाऱ्यांवर प्लास्टिक प्रदूषणाची गंभीर समस्या दिसून आली आहे. या प्लास्टिक प्रदूषणाचा विपरित परिणाम पर्यटनावर होण्याची भीती व्यक्त होत आहे.
अमेठी युनिव्हर्सिटीच्या नेतृत्वाखाली हे संशोधन राज्यातील पाच प्रमुख समुद्रकिनाऱ्यांवर झाले. यात पाळोळे, कोलवा, बायणा, मिरामार आणि कळंगुट यांचा समावेश होता. या किनाऱ्यांवर ७६.५ टक्क्यांपर्यंत प्लास्टिक कचरा आढळला. किनाऱ्यांवर प्लास्टिक प्रदूषण वाढत असल्याचे या अभ्यास अहवालात नमूद करण्यात आले आहे. या अभ्यासात बायणा किनाऱ्यावर सर्वाधिक ७६.५ टक्के, तर कळंगुट किनाऱ्यावर ६६.४ टक्के प्लास्टिक कचरा आढळला. मिरामार आणि कोलवा किनाऱ्यांवर लक्षणीय कागदाचा कचरा होता, तर पाळोळेमध्ये लाकडांच्या ढिगाऱ्याचे प्रमाण जास्त होते. एप्रिल २०२२ ते एप्रिल २०२४ पर्यंत हा अभ्यास करण्यात आला. अमेठी इन्स्टिट्यूटचे कुलदीप सिंग, राष्ट्रीय हायड्रोग्राफिक कार्यालयातील रामप्रसाद, पर्यावपरण अभ्यासिका डॉ. तनू लिंडल आदींच्या पथकाने हा अभ्यास केला.
कचरा विरोधी कठोर कायद्याची सक्ती करणे आवश्यक आहे. त्यासोबतच जनजागृती मोहीम सुरू करणे, समुद्रकिनारा स्वच्छतेच्या उपक्रमांमध्ये स्थानिक समुदायांना सहभागी करून घेणे व समुद्रकिनारी कचऱ्याचे सतत निरीक्षण करणे आदी सूचना या अभ्यास पथकाने सरकारला केल्या आहेत.