

पणजी : पुढारी वृत्तसेवा
पर्वरीमधील एका हॉटेलच्या बाथरूममध्ये बेशुद्धावस्थेत आढळलेल्या बंगळुरू येथील पर्यटक शिवकुमार एनटी (५८) यांचा मृत्यू झाला. त्यांना पर्वरी येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते.
मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली. शिवकुमार बंगळुरूहून मित्रासह गोव्यात आले होते. कॅसिनोला भेट देण्याच्या उद्देशाने ते गोव्यात आले होते. दोघांनी पर्वरीमधील हॉटेलमध्ये चेक इन केले होते. शिवकुमार दुपारी २ च्या सुमारास आंघोळीसाठी गेले. मात्र, बराच वेळ झाला तरी प्रतिसाद मिळाला नाही. त्यातच बाथरूमचा दरवाजा आतून बंद होता, तेव्हा त्याचा मित्र काळजीत पडला व त्याने हॉटेल कर्मचाऱ्यांना याची माहिती दिली. त्यानंतर दरवाजा उघडून त्यांना उपचारासाठी नेण्यात आले.