Goa | आंदोलनामुळे पार्किंग शुल्क ‘जैसे थे’

मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप : 3 ऑक्टोबरला बोलावली बैठक
parking-fees-remain-same-due-to-protest
मोप : प्रशासकीय इमारतीत घुसण्याचा प्रयत्न करणार्‍या आंदोलकांना रोखताना पोलिस.File Photo
Published on
Updated on

पणजी/पेडणे : पार्किंग शुल्कवाढीला विरोध म्हणून मोप येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ झालेल्या आंदोलनामुळे अखेर पार्किंग शुल्कवाढ तूर्त स्थगित करण्यात आली. येत्या 3 ऑक्टोबरपर्यंत पार्किंग शुल्क ‘जैसे थे’ असणार आहे. याप्रश्नी बैठक घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले. गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई व आरजी प्रमुख मनोज परब यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळासोबत चर्चा केल्यानंतर हा निर्णय जाहीर केला.

मोप येथील टॅक्सी व्यावसायिकांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिष्टमंडळाने पणजी येथील निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या शिष्टमंडळात रामा वारंग, निखिल महाले, आनंद गावस, दीपक कळंगुटकर, अनिकेत साळगावकर, अमित सावंत आदींचा समावेश होता. मोप मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टॅक्सी पार्किंग शुल्कात वाढ केल्याप्रकरणी टॅक्सी व्यावसायिक आक्रमक झाले. शेकडो टॅक्सी व्यवसायिक आणि विविध पक्षांचे राजकीय नेत्यांनी विमानतळ परिसरात घुसून प्रशासकीय इमारतीत घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. सुरक्षा रक्षक व पोलिसांनी आंदोलकांना रोखल्यानंतर त्यांनी तिथेच ठिय्या ठोकला. जोपर्यंत आमचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच राहणार असल्याचा निर्धार केला. या आंदोलनाला विविध पक्षांचे नेत्यांनीही पाठिंबा दिला होता.

सरकार आणि जीएमआर कंपनी वाढीव शुल्क कमी करत नसेल तर त्याचे पडसाद संपूर्ण गोव्यात उमटतील, असा इशारा टॅक्सी संघटनेचे नेते मोगॅम्बो यांनी दिला. सरकार आणि जी. एम. आर. कंपनीने वाढवलेले पार्किंग शुल्क तातडीने कमी करावे, अशी मागणी त्यांनी केली. मोप विमानतळ टॅक्सी व्यवसायिक आहे त्यांना पार्किंग शुल्क पूर्वी 80 रुपये होते ते मध्यरात्री टॅक्सी व्यावसायिकांना विश्वासात न घेता आणि कुठल्याही संघटनेला विश्वासात न घेता जी. एम. आर. कंपनीने दोनशे रुपये शुल्क केले. हे शुल्क न परवडणारे असल्याने टॅक्सी आंदोलन छेडले. माजी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी मोप विमानतळ प्राधिकरणाने जर वाढवलेले शुल्क कमी केले नाही तर आपण आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता.

सोमवारी शिवम वॉरियर्स टॅक्सी व्यावसायिक संघटनेने मोप विमानतळाच्या जुन्या मुख्य प्रवेशद्वारावर आंदोलन छेडले. हे आंदोलन शांतपणे सुरू होते. गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई, आरजी नेते मनोज परब यांच्यासह अन्य पक्षांचे नेते आल्यानंतर आंदोलनाने उग्र रूप धारण केले. शिवम वॉरियसचे अध्यक्ष रामा वारंग म्हणाले, यापुढे आम्ही गप्प राहणार नाही. आमच्या जमिनी गेल्या. आम्हाला नोकरी नाही आणि टॅक्सी व्यवसाय करण्यासाठी सरकार आम्हाला देत नाही. वारंवार आमच्या मागण्या धुडकावून सरकार लावत आहे आम्हाला नाही त्रास देण्याचे काम जीएमआर कंपनी करत आहे. जीएमआर कंपनीचा मनमानी कारभार वाढत आहे. सीईओ सेशन हे कोणालाही जुमानत नाही. त्यामुळे हे आंदोलन तीव्र करण्याचा इशारा त्यांनी दिला.

आमदार तथा गोवा फॉरवर्डचे नेते विजय सरदेसाई यांनी भेट देऊन या आंदोलन तापले. सरदेसाई म्हणाले, जीएमआर कंपनी ही स्थानिकांना कुठल्याही प्रकारे सुविधा देत नाही. बाहेरच्या लोकांचे चोचले पुरवण्याचे काम करत आहे. गेली दोन वर्षे हे टॅक्सी व्यावसायिक आपल्या न्याय हक्कासाठी लढत आहेत. स्थानिकांना प्राधान्य देण्यासोबतच पार्किंग शुल्क तातडीने कमी करावे. पार्किंग शुल्क कमी न केल्यास गावागावांत आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला.

आरजीचे अध्यक्ष मनोज परब म्हणाले, राज्य सरकार स्थानिकांना पुन्हा-पुन्हा सरकार रस्त्यावर उतरवत आहे. सध्या नवरात्र उत्सव सुरू असून पेडण्यातील नवदुर्गांना रस्त्यावर उतरण्याची वेळ सरकारने आणली आहे. सदर कंपनीकडून स्थानिकांना त्रास देण्याचा सातत्याने प्रयत्न होत आहेत, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हा विषय सोडवावा, अशी मागणी केली. अखिल गोवा टॅक्सी संघटनेचे नेते चेतन कामत, माजी जि. पं. सदस्य दीपक कळंगुटकर, अ‍ॅड. अमित सावंत, निखिल महाले, आनंद गावस आदींनी यावेळी सरकार आणि विमान कंपनीच्या प्रशासनावर टीका केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news