Goa Theatre Actress | बालपणीचे आघात अन् कौटुंबिक जबाबदाऱ्या; संघर्षातून घडलेल्या अभिनेत्री परिदा नाईक!

Goa Theatre Actress | जीवनाच्या रंगमंचावर प्रत्येकाच्या वाट्याला वेगवेगळ्या भूमिका येतात. काही भूमिका आनंद देतात, तर काही संघर्षातून माणसाला घडवतात
Goa Theatre Actress
Goa Theatre Actress
Published on
Updated on

रंगयात्रा : निवृत्ती शिरोडकर
जीवनाच्या रंगमंचावर प्रत्येकाच्या वाट्याला वेगवेगळ्या भूमिका येतात. काही भूमिका आनंद देतात, तर काही संघर्षातून माणसाला घडवतात. परिदा नाईक यांच्या आयुष्याचा प्रवास याच संघर्षातून आकाराला आला. बालपणीचे आघात, संसार आणि नोकरीच्या जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी रंगभूमीवरील आपली नाळ कधी तुटू दिली नाही.

Goa Theatre Actress
Goa Government Scrap | गोव्यात गेल्या 3 वर्षांत 838 सरकारी वाहने भंगारात; तिजोरीत 4.69 कोटींचा महसूल जमा!

अवघ्या बाराव्या वर्षी रंगमंचावर ठेवलेले पहिले पाऊल पुढे शेकडो भूमिका आणि प्रदीर्घ रंगसेवेत रूपांतरित झाले. कलेवरील निष्ठा, अनुभवातून समृद्ध झालेला अभिनय आणि परिस्थितीशी जुळवून घेत पुढे जाण्याची जिद्द, हे त्यांच्या रंगप्रवासाचे वैशिष्ट्य ठरले आहे.
परिदा नाईक यांच्या रंगप्रवासाची सुरुवात अगदी लहान वयात झाली.

अवघ्या बाराव्या वर्षी त्यांनी रंगभूमीवर पदार्पण केले. ज्या वयात मुलांचे जग शाळा, खेळ आणि मैत्रीपुरते मर्यादित असते, त्या वयात त्यांनी रंगमंच, संवाद, पात्र आणि प्रेक्षकांच्या टाळ्यांशी नाते जोडले. सुरुवातीला हा अनुभव छंद म्हणून सुरू झाला; मात्र कालांतराने रंगभूमी त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनली.

बालपण प्रत्येकासाठी सुखकर असेलच असे नाही. परिदा यांच्या वाट्यालाही लहानपणी अनेक आघात आणि कठीण प्रसंग आले. मात्र परिस्थितीसमोर खचून न जाता त्यांनी त्यातून उभे राहण्याची शक्ती शोधली.
दीर्घ नाट्यप्रवासात परिदा नाईक यांनी शेकडो भूमिका साकारल्या. सामाजिक, ऐतिहासिक, पौराणिक, कौटुंबिक तसेच संगीत नाटकांमध्ये त्यांनी विविध व्यक्तिरेखा साकारत अभिनयाची व्याप्ती वाढवली. 'सासूबाई, शिकलेली सून', 'जाई एक फूल', 'शिवकंकण', 'मेघगर्जना',

'राजा हरिश्चंद्र', 'संत ज्ञानेश्वर', 'स्वराज्य सेवक', 'पावनखिंडीचा रणसंग्राम', 'माझ्या सासुरच्या मंदिरी', 'झानाचा तराजू', 'फरारी', 'दिधले दान', 'सौभाग्याचे चांदणे शिंपीत जा', 'गीता गाती ज्ञानेश्वरी', 'सविता दामोदर परांजपे', 'मगरमिठी', 'हिरवा चुडा', 'अस्तित्व', 'आयुष्याचा खेळ', 'देवाघरचा न्याय', 'देव देहाऱ्यात आहे' आणि 'संगीत शारदा' अशा अनेक नाट्यकृतींमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या आहेत.

त्यांचा अभिनयप्रवास केवळ मराठी नाटकांपुरता मर्यादित राहिलेला नाही. कोकणी नाटक आणि तियात्र या माध्यमातूनही त्यांनी काम केले. 'राजा-राणी', 'आवाज', 'वेदना', 'बहिणीचा चुडा', 'शिकलेली बायको', 'जागोर', 'कस्तुरी', 'गुन्हेगार', 'पारिजात मी तुझ्या अंगणी', 'कुणाला माझा म्हणू मी' आणि 'हिरवं कुंकू' यांसारख्या नाट्यकृतींमधून त्यांनी विविध व्यक्तिरेखा साकारल्या. तमिळ डबिंग चित्रपटांमध्येही त्यांनी काम केले आहे.

अभिनयाचे औपचारिक प्रशिक्षण न घेता रंगभूमीवरील अनुभवातून त्यांनी अभिनयाचे अनेक बारकावे आत्मसात केले. रंगमंचावर मिळालेला प्रत्येक अनुभव त्यांच्यासाठी शिकवण ठरला.

Goa Theatre Actress
Goa Politics | गोव्यात नवा राजकीय भूकंप? 'आप'ची साथ सोडून गोवा फॉरवर्ड पुन्हा काँग्रेसच्या वाटेवर!

अनेक अडचणींवर केली मात...

परिदा यांच्या प्रवासात मात्र अडचणींना थांबण्याचे कारण न बनवता त्यातून मार्ग काढण्याची वृत्ती दिसते. रंगभूमीवर काम करताना प्रत्येक प्रयोग हा स्वतःला तपासण्याची संधी आहे, या भावनेने त्यांनी भूमिका स्वीकारल्या. प्रेक्षकांच्या प्रतिसादातून मिळणारा अनुभव आणि सहकलाकारांकडून मिळणारे मार्गदर्शन यामुळे त्यांची कलात्मक वाटचाल अधिक समृद्ध होत गेली.
नाटकाची तालीम म्हणजे केवळ काही तासांचा सराव नव्हे. संवाद पाठांतर करणे, व्यक्तिरेखा समजून घेणे, तालीमीसाठी वेळ देणे, प्रयोगासाठी प्रवास करणे आणि उशिरापर्यंत चालणाऱ्या प्रयोगांनंतर पुन्हा दैनंदिन जबाबदाऱ्यांना सामोरे जाने, या सगळ्यांसाठी वेळेचे नियोजन आणि मानसिक तयारी आवश्यक असते. संसार आणि नोकरी सांभाळताना त्यांनी ही शिस्त जपली. त्यामुळे परिदा नाईक यांची वाटचाल केवळ एका अभिनेत्रीची कथा राहत नाही. ती कुटुंब, कर्तव्य आणि कला यांच्यात समतोल साधणाऱ्या स्त्रीच्या जिद्दीची कहाणी नवोदितांसाठी प्रेरणादायी ठरते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news