

पणजी : मळा पणजी व इतर ज्या भागात वारसा (हेरीटेज) इमारती आहेत, तेथील लोकांच्या विनंतीनुसार, पणजी महापालिकेने वार्डन नियुक्त करून सदर भागात तैनात करण्याचे ठरवले आहे. मळा व फोंतेन्हास येथील ऐतिहासिक भागात पर्यटकांची गर्दी होते. लोकांच्या दारासमोर पर्यटक वाहने ठेवतात. त्यामुळे स्थानिकांना त्रास सहन करावा लागतो. या समस्यांवर मात करण्यासाठी खासगी सुरक्षा एजन्सीद्वारे वॉर्डन नियुक्त करण्याचे महापालिकेने ठरवले आहेत. त्यासाठी महापालिका निविदा काढणार आहे.
महापौर रोहित मोन्सेरात यांनी मंगळवारी महापालिका कार्यालयात हेरिटेज भागातील रहिवाशांची बैठक घेतली. वार्डन नियुक्त करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे आणि महसूल मंत्री आणि आमदार बाबुश मोन्सेरात व संबंधित अधिकाऱ्यांनी होकार दिल्यानंतर निविदा काढली जाईल. आम्ही सुरुवातीच्या सहा महिन्यांच्या कालावधीसह योग्य निविदा प्रक्रियेद्वारे वॉर्डनची नियुक्ती करण्याचा विचार करत आहोत. वार्डन नियुक्त केल्यानंतर सर्व काही सुरळीत होत असल्याचे दिसल्यास आम्ही मुदत वाढवू शकतो, असे मोन्सेरात यांनी सांगितले.