

पणजी : डिचोली गोवा येथे जन्मलेले व सध्या मुंबईत स्थायिक झालेले प्रसिद्ध गायक पं. अजितकुमार कडकडे यांना गोव्याचा सर्वोच्च असा प्रतिष्ठेचा गोमंतविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शुक्रवारी कला अकादमीच्या मा. दिनानाथ मंगेशकर सभागृहात आयोजित गोव्याच्या 39 व्या घटकराज्य दिन सोहळ्यात ही घोषणा केली.
गोव्यात जन्म घेऊन विविध क्षेत्रात नावलौकिक मिळवून जागतिक पातळीवर यश मिळवलेल्या ज्येष्ठ व्यक्तीला दर दोन वर्षांनी हा पुरस्कार दिला जातो. यापूर्वी वैज्ञानिक डॉ. अनिल काकोडकर, वास्तुविशारद तज्ज्ञ चार्लस कुरैय्या, वैज्ञानिक डॉ. रघुनाथ माशेलकर, पत्रकार व विचारवंत लेंबर्ट मास्कारेन्हास, चित्रकार लक्ष्मण पै, आरोग्यतज्ज्ञ डॉ. प्रेमानंद रामाणी, लोकवेद अभ्यासक विनायक खेडेकर, गायक प्रभाकर कारेकर यांना हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे.
हा पुरस्कार सर्वप्रथम माझ्या आई-वडिलांचा. त्यानंतर माझे गुरू पं. जितेंद्र अभिषेकी यांचा आहे. पं अभिषेकी यांच्या सानिध्यात माझी गायकी सुरू झाली. त्याचप्रमाणे ज्या संतांचे अभंग, भक्तिगीते मी गात नावलौकिकास आलो त्या संतांच्या आशीर्वादाने आणि जे रसिक हे माझे गायन मनःपूर्वक ऐकतात त्यांचाही हा पुरस्कार आहे. आणि सर्वात शेवटी हा पुरस्कार माझा. असे मी म्हणेन. हा पुरस्कार मला जाहीर केल्याबद्दल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व गोवा सरकारचे मी मनःपूर्वक आभार मानतो, अशी प्रतिक्रिया पं. अजितकुमार कडकडे यांनी ’गोमंत विभूषण’ पुरस्कार जाहीर झाल्यानंतर व्यक्त केली.