

पणजी ः जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी भाजपने 19 मतदारसंघातील उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये 13 जण उत्तर गोव्यातील तर 6 जण दक्षिण गोव्यातील आहेत. खोर्लीचे विद्यमान जिल्हा पंचायत सदस्य सिद्धेश नाईक यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपने नव्या चेहऱ्यांना पसंती देत सुमारे 80 टक्के नव्यांना संधी दिली आहे. भाजपचे उर्वरित उमेदवारांची घोषणा येत्या दोन दिवसांत होण्याची शक्यता आहे.
या निवडणुकीत भाजप व मगोची युती आहे; मात्र मगोला तीन जागा मिळण्याची शक्यता असून, त्यावरच समाधान मानावे लागणार आहे. विरोधकांच्या युतीवर अजून शिक्कामोर्तब झालेले नाही. त्यामुळे उमेदवारांची नावे जाहीर करण्यामध्ये अडचणी येत आहेत. सगळ्याच राजकीय पक्षामध्ये एकापेक्षा अधिक उमेदवार निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. ज्यांना उमेदवारी मिळणार नाही ते अपक्ष राहून बंडखोरी करण्याची शक्यता आहे.
उत्तर गोव्यातील उमेदवारांमध्ये सपना वासुदेव मापारी (कोलवाळ, महिला राखीव), सागर सुधाकर मावळणकर (शिरसई, सर्वसाधारण), फ्रेंझिला सेलिन (फ्रान्सिस) रॉड्रिग्ज (कळंगुट, महिला राखीव), अमित देविदास अस्नोडकर (सुकूर, सर्वसाधारण), रेश्मा संदीप बांदोडकर (रेईश मागूश, महिला राखीव), संदीप दत्ताराम साळगावकर (पेन्ह द फ्रान्स, सर्वसाधारण), रघुवीर नारायण कुंकळ्येकर (ताळगाव, अनुसूचित जमाती), सिद्धेश श्रीपाद नाईक (खोर्ली, सर्वसाधारण),
पद्माकर अर्जुन मलिक (लाटंबार्से, सर्वसाधारण), सुंदर मोर्तू नाईक (पाळे, ओबीसी), नामदेव बाबल च्यारी (होंडा, ओबीसी), नीलेश शांबा परवार (केरी, अनुसूचित जाती), प्रेमनाथ गणेश दळवी (नगरगाव, सर्वसाधारण) तर दक्षिण गोव्यातून समीक्षा वामन नाईक (उसगाव गांजे, महिला), श्रमेश सुकडू भोसले (बेतकी कांदोळा, सर्वसाधारण), प्रीतेश प्रेमानंद गावकर (कुर्टी, अनुसूचित जमाती), मोहन परशुराम गावकर (सावर्डे, अनुसूचित जमाती), सिद्धार्थ श्रीनिवास गांवस देसाई (शेल्डे, सर्वसाधारण), सुनील महादेव गावस (सांकवाळ, सर्वसाधारण) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यासंदर्भाताचे पत्रक गोवा प्रदेश भाजप सरचिटणीस सिद्धार्थ कुंकळ्येकर यांनी काढले आहे.
दोन दिवसांत उमेदवारांची घोषणा : मंत्री ढवळीकर
मगो पक्षातर्फे येत्या दोन दिवसांत जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा करण्यात येईल, असे वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी सांगितले.