पणजी : पणजी महापालिका निवडणुकीत टुगेदर फॉर प्रोग्रेसिव्ह पणजी या मंत्री बाबूश मोन्सेरात यांच्या पॅनलला एकूण मतदान झालेल्या मतांपैकी १८.१६ टक्के मते आम्ही पणजीकर पॅनलपेक्षा अधिक मिळाली. त्यामुळे मोन्सेरात यांच्या पॅनलला निर्विवाद विजय मिळाल्याचे सिद्ध होते.
या निवडणुकीसाठी एकूण ३० जागांसाठी ६९ उमेदवार रिंगणात होते तर एकूण मतदारांची संख्या ३२ हजार ४९८ इतकी होती. त्यामध्ये १५,१६८ पुरुष तर १७,३२८ महिला मतदार होते. यापैकी २२ हजार ४४४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला त्यामध्ये १०,५७४ पुरुष व ११,८७० महिला मतदारांचा समावेश होता.
बाबूश मोन्सेरात समर्थक टुगेदर फॉर प्रोग्रेसिव्ह पणजी या पॅनलच्या उमेदवारांना १२,७४९ मते (५६.८० टक्के) मिळाली तर आम्ही पणजीकर पॅनलला ८,६३४ मते (३८.६४ टक्के) मिळाली. एकूण ३० प्रभागांपैकी अर्ध्या प्रभागांमध्ये (१५ प्रभाग) विजयी झालेल्या उमेदवारांच्या मतदानाचा फरक १०० मतांपेक्षा कमी आहे. यावरून ही लढत मोन्सेरात पॅनलने जिंकली असली तरी काही प्रभागात चुरशीची लढत झाली आहे. १० हजार ५२ मतदारांनी (३०.९३ टक्के) मतदानाचा हक्क बजावला नाही. त्यातील काही परदेशात तर काहींनी मत देणे टाळले असण्याची शक्यता आहे.
२०२१ नंतर मतदानाचा १ टक्का कमी झाला
२०२१ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीवेळेपेक्षा यावेळी मतदानाचा १ टक्का कमी झाला. कमी झालेला टक्का हा फटका दिलेला अशी भाकिते वर्तविली जात होती; मात्र ती सर्व मंत्री मोन्सेरात यांच्या पॅनलने पूर्णपणे फोल ठरविली.