पणजी : पर्यटन हंगाम सुरू झाला आहे. दिवाळीची सुट्टी शैक्षणिक संस्थाना पडली आहे. त्यामुळे देशी पर्यटकांचा ओघ गोव्याकडे वाढला आहे, साहजिकच मोठ्या माशांचा दरही वाढला आहे. गोव्यात बहुतेक पर्यटक मासे खायला आणि मद्य पिण्यासाठी येतात. त्यांची संख्या वाढू लागल्याने माशांचे दर वाढू लागले आहेत.
मागच्या रविवारी २० ऑक्टोबर रोजी इसवणाचा दर ६०० ते ७०० रुपये किलो होता. तो या रविवारी वाढून ९०० ते १ हजार २०० रुपयांपर्यंत पोचला होता. यामुळे गेले अनेक आठवडे इसवणाच्या दरापेक्षा अधिक दर असलेले पापलेट दर स्थिर असल्याने स्वस्त वाटत होते.
पापलेटचा दर ९०० ते १ हजार रुपये किलो असाच होता. छोट्या पापलेटचा दर मात्र ५०० च्या आसपास होता. नेहमीप्रमाणे ८ ते ९ पापलेट ५०० रुपयांना मिळत होती. छोटा सरंगा (काळे पापलेट) ३०० ते ५०० रुपये तर । प्रॉन्स २५० ते ३०० रुपये किलो दराने मिळत होते. हिरवेगार ताजे मोठे बांगडे । १०० रुपयांना ८ ते ९ मिळत होते. इसवण महाग असल्याने अनेक विक्रेते इसवणाचे वाटे विकत होते. त्यांचा दर ५०० ते १ हजार रुपये होता.