

पणजी : मागील काही दिवसांपासून थंडावलेला मान्सून पुन्हा सक्रिय झाला, असून 24 तासांत 103.8 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पाऊस फोंडा येथे 220.8 मि.मी. झाला आहे. तरीही पावसाची 16 टक्के तूट आहे, अशी माहिती हवामान खात्याच्या गोवा वेधशाळेने दिले आहे. शनिवारपासून 16 जूनपर्यंत मुसळधार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ असेल.
वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर आणि दक्षिण गोव्यात आजपासून 16 जून दरम्यान, जोरदार पावसाचा ’ऑरेंज अलर्ट’ आहे. या कालावधीत काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यानंतर, 17 ते 19 जून दरम्यान, राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात गोव्यात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याने लोकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले असून, विशेषतः सखल भागांत राहणार्या नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. मागील 24 तासांत 103.8 मि.मी. पावसाची नोंद झाली असून आतापर्यंत 288.4 मि.मी. अपेक्षित पाऊस होता. मात्र, 242.4 मि.मी. पाऊस पडला आहे. त्यामुळे सुमारे पावसाची 16 टक्के तूट आहे. 24 तासांत फोंड्यात 220.8, सांगेत 143.4, काणकोणात 140.2, केपेत 100, म्हापशात 98, पेडणेत 90.8, पणजीत 90.5, जुने गोवेत 85.8, मडगावात 80 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.