

पणजी : गेल्या काही दिवसांपासून थांबलेला मान्सून पुन्हा सक्रिय झाला, असून गेल्या 24 तासांत 57.2 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पाऊस पेडणे येथे 145.8 मिलीमीटर झाला आहे. तरीही पावसाची 9.1 टक्के तूट आहे, अशी माहिती हवामान खात्याच्या गोवा वेधशाळेने दिले आहे. रविवारी 15 व सोमवारी 16 रोजीपर्यंत मुसळधार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ असेल.
वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात उद्या व परवा जोरदार पावसाचा ’ऑरेंज अलर्ट’ आहे. या कालावधीत काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यानंतर, 17 ते 19 जून दरम्यान राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा ’येलो अलर्ट’ जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात गोव्यात पावसाचा जोर कायम असेल. गेल्या 24 तासात 57.2 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून आत्तापर्यंत 326.2 मिलिमीटर अपेक्षित पाऊस होता. मात्र 296.6 मिलिमीटर पाऊस पडला आहे, त्यामुळे अध्यापी पावसाची 9.1 टक्के तूट आहे. गेल्या 24 तासात पेडणे येथे 145.8 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून म्हापसा येथे 89.2, तर पणजीत 67.8 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून आतापर्यंत सर्वाधिक पाऊस काणकोण येथे 410 मिलिमीटर झाला आहे.