

पणजी: गोव्यातील खासगी महाविद्यालयांच्या व्यवस्थापनांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या फोरमने गोवा विद्यापीठाने सुरू केलेल्या एकात्मिक पदवी-पदव्युत्तर (यूजी पीजी) अभ्यासक्रमांवर तीव्र आक्षेप नोंदवला असून, या निर्णयात कुलगुरूंनी हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली आहे.
२९ एप्रिल रोजी सादर केलेल्या निवेदनात फोरम ऑफ प्रिन्सिपल्स अँड रिप्रेझेंटेटिव्ह्ज ऑफ मॅनेजमेंट्स ऑफ नॉन-गव्हर्नमेंट कॉलेजेस इन गोवाने नमूद केले आहे की, नव्या एकात्मिक अभ्यासक्रमांसंदर्भातील अध्यादेश अकादमिक कौन्सिलच्या बैठकीत योग्य प्रक्रियेविना मांडण्यात आला. त्यानंतर २०२६-२७ शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया जाहीर करण्यात आली, याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली.
फोरमने स्पष्ट केले की, विज्ञान, सामाजिक विज्ञान, व्यवस्थापन आणि माध्यम अभ्यास अशा विविध शाखांमध्ये नऊ एकात्मिक अभ्यासक्रम जाहीर करण्यात आले आहेत. यात केमिकल सायन्सेस, फिजिक्स, पब्लिक पॉलिसी अँड गव्हर्नन्स, तसेच फायनान्शियल सव्र्हिसेसमधील अॅडमिनिस्ट्रेशन बिझनेस यांसारख्या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. मात्र, उच्च
शिक्षण संचालनालयाने यापूर्वी जारी केलेल्या निर्देशांनुसार कोणतेही नवीन पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी राज्य शासनाची पूर्वमान्यता आवश्यक आहे. ही प्रक्रिया पूर्ण न करता अभ्यासक्रम सुरू केल्याचा आरोप फोरमने केला आहे.
या निर्णयामुळे संलग्र महाविद्यालयांवर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. आधीच घटत्या प्रवेशसंख्येचा सामना करणाऱ्या महाविद्यालयांसाठी ही परिस्थिती अधिक गंभीर ठरू शकते, असे फोरमचे म्हणणे आहे. तसेच यामुळे आर्थिकदृष्ट्याही महाविद्यालये व शासनाचर ताण येऊ शकतो, अशीही त्यांनी शक्यता व्यक्त केली. दरम्यान, या संदर्भात मुख्यमंत्री, शिक्षण सचिव आणि उच्च शिक्षण संचालक यांच्याकडे कारवाईची विनंती करण्यात आली आहे.