

सासष्टी : चिंचोळणने येथील स्वतःच्या दवाखान्यातील परिचरिकेवर लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणात कुंकळ्ळी पोलिसांनी अटक केलेला डॉ. सॅम्युएल अवरटगी याने जामिनासाठी येथील सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. त्यावर बुधवारी युक्तीवाद होणार आहे. दरम्यान, पोलिसांनी सोमवारी त्याला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकार्यासमोर उभे केले असता त्याला पुन्हा चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
मागील तीन दिवसांपूर्वी ही लैंगिक अत्याचाराची घटना घडली होती. डॉक्टरने त्या परिचारिकेला एका रुग्णाच्या घरी भेट द्यावयाचे असल्याचे सांगून वाहनात बसवून नेले. पण रुग्णाच्या घरी न जाता तिला स्वतःच्या घरी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. या प्रकरणी पीडित परिचारिकेचे म्हणणे न्यायालयाला जाणून घ्यायचे आहे. त्यासाठी न्यायालयाने परिचारिकेला नोटीस पाठवली आहे. कुंकळ्ळी पोलिसांनी डॉक्टरविरुद्ध जामिनाला आक्षेप घेण्यासाठी न्यायालयाला निवेदन सादर केले आहे.
मडगाव : बलात्कारप्रकरणी सध्या कुंकळ्ळी पोलिसांच्या कोठडीत असलेला डॉ. सॅम्युएल अर्गटगी याची पोलिस सखोल चौकशी करीत आहेत. पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. अहवाल येणे बाकी असल्याची माहिती पोलिस ठाण्याचे निरीक्षक डायगो ग्रासियस यांनी दिली. पीडित काम करीत असलेल्या क्लिनिकच्या अन्य कर्मचार्यांकडूनही माहिती घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. पीडितेच्या आईने यासंबंधी पोलिसात तक्रार नोंदविली होती. संशयित डॉ. सॅम्युएल गोवा आयएमएचे माजी अध्यक्ष होते. चिंचणी येथे त्याचे क्लिनिक आहे. पीड़िता ही त्याच्याकडे नर्स म्हणून कामाला होती.