

पणजी : रशियन मुलीच्या हत्या प्रकरणात जामिनावर बाहेर असलेल्या कुख्यात संशयित ड्रग्ज तस्कराला 3.65 लाख रुपयांच्या अमलीपदार्थासह मांद्रे पोलिसांनी हरमल येथून अटक केली. त्याच्याकडून 300 ग्रॅम वजनाचे चरस आणि 65,000 रुपये किमतीच्या 06.45 ग्रॅम वजनाच्या एमडीएमएसह मोबाईल फोनही जप्त केला. डेनिस क्रिचकोय (वय 51, हरमल, मूळ रशिया) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.
रशियन नागरिक असलेला डेनिस क्रिचकोय 2017 मध्ये गोव्यात आला होता व तेव्हापासून तो हणजूण परिसरात राहत होता. गोव्यात वास्तव्यादरम्यान तो ड्रग्ज तस्करीच्या कारवायांमध्ये सक्रियपणे सहभागी झाला होता. एवढेच नाही, तर 2021 मध्ये त्याला रशियन मुलीच्या हत्येप्रकरणी हणजूण पोलिसांनी अटक केली होती. नंतर या प्रकरणात त्याला जामिनावर सोडण्यात आले होते. तथापि, जामिनावर बाहेर असूनही क्रिचकोय यांनी बेकायदेशीर कारवायांमध्ये सहभाग सुरू ठेवला होता. याप्रकरणी पोलिस विभागाने त्याच्या कारवाया आणि ठावठिकाण्यांवर पाळत ठेवली होती. तसेच गुप्तचर यंत्रणेकडून अहवाल मिळवले जात होते. यात डेनिस याने पुन्हा ड्रग्ज तस्करी सुरू केल्याचे उघड झाले. त्याने हणजूण, कळंगुट, हरमल आणि मांद्रे भागात अमलीपदार्थांचा पुरवठा केल्याचा संशय होता.
यामुळे 12 जून रोजी मधलावाडा, हरमल येथे छापा टाकला. मांद्रे पोलिस ठाण्याच्या कर्मचार्यांनी पोलिस उपनिरीक्षक लक्ष्मण देसाई यांच्या नेतृत्वाखालील दोन पंचांसह विशिष्ट माहितीवरून कारवाई करत अमलीपदार्थांवर छापा टाकून सराईत ड्रग्ज तस्कर डेनिस क्रिचकोय याला 3 लाख रुपये किमतीचे 300 ग्रॅम वजनाचे चरस आणि 65 हजार रुपये किमतीचे 06.45 ग्रॅम वजनाचे एमडीएमए बाळगल्याप्रकरणी रंगेहात पकडले.
या प्रकरणाचा पुढील तपास मांद्रे पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक गिरेंद्रे नाईक यांच्या देखरेखीखाली आणि उपअधीक्षक सलीम शेख व पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
रशियन नागरिक असलेला डेनिस क्रिच कोय हा 2017 मध्ये गोव्यात आला होता. तेव्हापासून तो हणजूण परिसरात राहत होता. त्यानंतर तो ड्रग्ज तस्करीच्या कारवायात सक्रिय झाला. 2021 मध्ये त्याला रशियन मुलीच्या हत्त्येप्रकरणी आयपीसीच्या कलम 302 अंतर्गत हणजूण पोलिसांनी अटक केली. नंतर त्याची जामिनावर सुटका झाली. त्यानंतर पुन्हा ड्रग्ज प्रकरणात तो सक्रिय झाला.