

पणजी : उत्तर गोव्यातील पोलिस स्थानक आणि गुन्हा अन्वेषण विभागाने गेल्या 6 महिन्यांत 54 अमलीपदार्थ प्रकरणाची नोंद केली असून सुमारे 58 कोटी 34 लाख 40 हजार 645 रुपयांचे अमलीपदार्थ जप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणी 69 जणांना अटक करण्यात आल्याची माहिती उत्तर गोवा पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी दिली.
ते म्हणाले, अटक करण्यात आलेल्यांमध्ये 22 गोमंतकीय, 38 बिगर गोमंतकीय आणि 9 विदेशी नागरिकांचा समावेश आहे. जप्त केलेल्या अमलीपदार्थामध्ये गांजा, चरस, कोकेन, एमडीएमए, हेरॉईन आदींचा समावेश आहे.
गुन्हा अन्वेषण विभागाने 12 तर हणजूण पोलिसांनी 11 प्रकरणांची नोंद केली आहे, पणजी 2 प्रकरणे, जुने गोवे 2 प्रकरणे, म्हापसा 5, कोलवा 4, पेडणे 1, मांद्रे 5, मोप 1, कळंगुट 7, साळगाव 1 तर डिचोली पोलिसांनी 3 प्रकरणांची नोंद केली आहे. वाळपई आणि आगशी येथे एकाही प्रकरणाची नोंद झालेली नाही. गुन्हा विभागाने सर्वाधिक 22 संशयितांना केली आहे. हणजूण पोलिसांनी 11, कळंगुट पोलिसांनी 8, कोलवा आणि म्हापसा पोलिसांनी प्रत्येकी 6 जणांना, मांद्रे पोलिसांनी 5 जणांना अटक केली. यावर्षी राज्यात आतापर्यत 75 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचे अमली पदार्थ जप्त केले आहेत.