पणजी : राज्यात बुधवारी नरकासुर प्रतिमांच्या स्पर्धा आणि फेरी पार पडल्या. या फेरींसाठी वापरलेले डीजे व डॉल्बी साऊंड आणि लेझर लाईटच्या वापरामुळे सर्वसामान्यांना मोठा त्रास सहन करावा लागला. कानठळ्या बसवणार्या कर्णकर्कश आवाजाचा त्रास लहान बालके, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींना झाला. रात्री 11 नंतर मोठ्या आवाजास बंदी असतानाही पोलिसांनी तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे संपूर्ण रात्रभर डॉल्बी, डीजेच्या मोठ्या आवाजाचा सामना लोकांना करावा लागला. नरकासुर दहनाच्या नावाखाली यावर्षी ध्वनी प्रदूषणाने पातळी ओलांडली होती.
राज्यात नरक चतुदर्शीच्या आदल्या रात्री नकरासूर बनवून त्याचे पहाटे दहन करण्याची प्रथा आहे. त्यासाठी राज्यभरात ठिकठिकाणी नरकासूर तयार करण्यात आले होते. मात्र, डीजे, डॉल्बीसह नरकासूर प्रतिमा आकर्षक दिसाव्यात यासाठी वापरलेल्या लेझर लाईटचा मोठा त्रास वाहन चालकांना सहन करावा लागला. त्यामुळे लहान-मोठे अपघातही घडले. लेझर लाईटमुळे समोरिल वाहन दिसत नव्हते. हा प्रकार रात्रभर सुरू होता. अन्य राज्यांत बंदी असलेल्या डॉल्बी, डिजे साऊंडसह लेझर लाईटचा यावर्षी मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला. पहाटे पाच ते सहा वाजेपर्यंत नरकासूर प्रतिमा जाळेपर्यंत हा कानठाळ्या बसवणारा आवाज सुरू होता.
नरकासूर प्रतिमांचे दहन बहुतांश ठिकाणी रस्त्यांच्या बाजूला करण्यात आले. त्यामुळे दिवसभर नरकासूरांच्या प्रतिमांचे सांगाडे अनेक ठिकाणी रस्त्याकडेला विखुरलेले दिसत होते. त्यामुळे वाहनचालकांना त्रास होत होता. पणजी महापालिकेच्या कामगारांनी शहरातील सांगाडे हटवले. मात्र, अन्यत्र ते तसेच कायम आहेत.
रात्रभर चालू असलेला धिंगाणा व कानठळ्या बसवणार्या आवाजामुळे त्रास झालेल्या काहींनी पोेलिसांनी फोन केला; मात्र वर्षातला ‘एक दिवस सोसा हो’ असा अजब सल्ला पोलिस देत होते. तर पोलिसांना कळवले तर पोलिस आयोजक मंडळाला आपले नाव सांगतील. यातून वैरत्व निर्माण होईल, या भीतीने अनेकांनी हा त्रास निमूटपणे सहन केला.