

पणजी : राज्यात मागील काही दिवसांपासून टॅक्सी व्यावसायिक, चालकांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचा भाग म्हणून त्यांनी विविध लोकप्रतिनिधींना भेटून याप्रकरणी हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. आमदार मायकल लोबो, जीत आरोलकर या किनारी भागातील आमदारांनी टॅक्सी चालकांच्या आंदोलनाला आपला पाठिंबा व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आमदार लोबो आणि आरोलकर यांच्यासह मंत्रालयात बैठक घेऊन टॅक्सी धोरणाबाबत स्पष्टीकरण देताना सांगितले की, राज्यात ओला-उबेर येणार नाहीत.
मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, ओला आणि उबेरसारखे अॅग्रीगेटर गोव्यात येणार नाहीत. टॅक्सी अॅग्रीगेटर मार्गदर्शक तत्त्वांमुळे नागरिकांनी गोंधळून जावूनये, टॅक्सी प्रश्न सोडवताना स्थानिक टॅक्सी चालक, हॉटेल व्यावसायिक, आमदार आणि इतर सर्व संबंधित घटकांचा विश्वास संपादन करूनच निर्णय घेण्यात येणार आहे. राज्यातील टॅक्सी व्यवसाय अधिक पारदर्शक आणि पर्यटकांसाठी सुलभ करण्याच्या दृष्टीने राज्य सरकार काम करत असून, कोणत्याही निर्णयामुळे स्थानिक व्यवसायांना धोका निर्माण होणार नाही, याची काळजी घेतली जाईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
बैठकीनंतर आमदार जीत आरोलकर म्हणाले, टॅक्सी चालकांना ओला, उबेरसारखे खासगी आणि परराज्यातील अॅग्रीगेटर्स येतील व त्यामुळे स्थानिकांचा व्यवसाय धोक्यात येईल, अशी भीती आहे. आज मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, अशा प्रकारचे खासगी अॅग्रीगेटर्स राज्यात येणार नाहीत, सरकारची दराबाबतची समानता हा मुद्दा असून व्यवसायात पारदर्शकता असावी, यासाठी सरकारचे प्रयत्न आहेत, त्याला आमचा पाठिंबा आहे.