

पणजी : पणजी बाजार परिसरात असलेली जुनी एलडोराडो इमारत पाडण्याचा व मळा फोंताईनस भागात वारसा इमारतींच्या परिसरात निरीक्षक तैनात करण्याचा निर्णय महापालिकेच्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी गेल्या 25 वर्षांत यावर्षी प्रथमच पणजीत पूर आला नाही, असे महापौर रोहित मोन्सेरात म्हणाले.
ते म्हणाले, एलडोराडो ही इमारत फार जुनी झाली आहे. ती पाडण्याचा निर्णय झालेला आहे. त्यासाठी त्या इमारतीत असलेल्या दुकानदारांना दुकाने खाली करण्याची सूचना केली जाणार आहे. शहरात डेंग्यूचा प्रसार होऊ नये यासाठी आरोग्य खात्याला दक्ष राहण्याबाबत कळवण्यात येणार आहे. तसेच मळा परिसरातील वारसा इमारती पाहण्यासाठी येणार्या पर्यटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तेथे महापालिका निरीक्षक तैनात करणार आहे. दयानंद बांदोडकर मैदानावर साचलेले पाणी काढण्यास क्रीडा खात्याला पत्र लिहिले जाणार आहे.
सांतिनेज येथील स्मशानभूमीसाठी संरक्षक भिंतीची पुनर्बांधणी आणि पावसाच्या पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था करणे, फाल्कन इमारतीला लागून असलेल्या जुन्या महानगरपालिका बाजार इमारतीच्या संरचनात्मक विश्लेषण चाचणी करणे, महापालिकेसाठी 1 शववाहिका व्हॅन खरेदी कऱणे, रुआ सालगाडो रोडवर मासे विक्रेत्यांसाठी तात्पुरते शेड उपलब्ध करून देणे, महापालिकेच्या ट्रकांच्या दुरुस्तीला मान्यता देणे, महापालिका कार्यक्षेत्रातील सानइनेज येथील प्राण्यांच्या निवारा शेडच्या दुरुस्तीसाठी खर्च मंजुरीसाठी मान्यता देणे आदी प्रश्नांवर चर्चा न होताच त्यांना मंजुरी देण्यात आली.
चौकट -
विरोधक गैर हजर
प्रत्येक महापालिका बैठकीला उपस्थित राहून विविध विषयावरून सत्ताधारी गटाला धारेवर धरणारे ज्येष्ठ नगरसेवक सुरेंद्र फुर्तादो व उदय मडकईकर यांच्यासह रुथ फुर्तादो व जोयेल आंद्राद हे विरोेधी नगरसेवक आजच्या बैठकीला गैर हजर राहिले. त्यामुळे या बैठकीत फारशी चर्चा झाली नाही.
------
स्मार्ट सिटीची कामे चांगली...
पणजी शहरात प्रत्येक पावसात पूर यायचा. शहरातील महत्त्वाच्या काही रस्त्यावर पाणी भरत होते. मात्र 25 वर्षांत यंदा पहिल्यांदाच पणजीत रस्ते पाण्याखाली गेले नाहीत. त्यामुळे स्मार्ट सिटीची कामे चांगली झाली, हे सिद्ध होते, असेही महापौर म्हणाले