

दाबोळी : वेर्णा बायपासवर गुरुवारी रात्री रुग्णवाहिका व कारचा अपघात घडला. नवजात बालकांना घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेला एका कारने जोरदार धडक दिली. मडगाव येथील दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयाच्या दिशेने ही रुग्णवाहिका जात असताना वेर्णा बगल रस्त्यावर हा अपघात झाला.
या भीषण धडकेनंतरही रुग्णवाहिकेतील सर्व नवजात बालके आणि वैद्यकीय कर्मचारी पूर्णपणे सुरक्षित असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार, रुग्णवाहिका बालकांना घेऊन जात असताना समोरून येणाऱ्या कारने तिला धडक दिली. या अपघातातील कारचालक तरुणी दारूच्या नशेत असल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला असून, त्यादृष्टीने तपास सुरू आहे. अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती, मात्र बालके सुरक्षित असल्याचे समजताच सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.
युवतीची वैद्यकीय चाचणी होणार
पोलिसांनी घटनास्थळी वाहतूक कोंडी दूर केली. मद्यपान करून वाहन चालवल्यामुळे निष्पाप जीवांना धोका निर्माण झाल्याने स्थानिकांकडून संताप व्यक्त होत आहे. सध्या वेर्णा पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून कारचालक तरुणीची वैद्यकीय चाचणी केली जाणार आहे.