

मडगाव : भारताचा माजी क्रिकेटपटू आशिष नेहरा यांनी केळशी येथे एक घर व नऊ लाकडी कॉटेज उभारणीसाठी परवानगी मागितली आहे. या प्रकल्पाला गोवा कोस्टल झोन मॅनेजमेंट ऑथरिटीकडून (सीआरझेड) मंजुरी मिळालेली असली, तरी पंचायतीची परवानगी अद्याप बाकी आहे. या अनुषंगाने केळशी पंचायत 11 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता प्रत्यक्ष जागेची पाहणी करणार आहे.
नेहरा यांनी 11 जून 2025 रोजी पंचायतीकडे अर्ज सादर केला होता. त्यात वास्तव्यासाठी एक घर व नऊ लाकडी कॉटेज उभारण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, या प्रस्तावाला स्थानिकांनी विरोध दर्शवला होता. कॉटेज उभारणीमुळे पर्यावरणाला धोका निर्माण होईल, असा ग्रामस्थांचा आक्षेप होता.
याआधी नेहरा यांच्या केळशी येथील जागेवरील तोडण्यात आलेल्या झाडांमुळे व परवानगीविना रस्त्याची निर्मिती करण्यात आल्याने गोंधळ निर्माण झालेला होता. त्यानंतर ती जागा पूर्ववत करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा नेहरा यांच्यातर्फे हिमांशू जैन यांनी पंचायतीकडून परवानगी मिळावी यासाठी अर्ज केला आहे.