

पणजी : राज्यातील अग्निशमन दलाच्या जवानांना लवकरच ‘अग्नी जोखीम भत्ता’ दिला जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सोमवारी केली.
राष्ट्रीय अग्निशमन सेवा दिन 2025 (शहीद) दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी सेवा बजावत असताना शहीद झालेल्या जवानांना आदरांजली वाहिली. याप्रसंगी मुख्य सचिव डॉ. व्ही. कांडावेलू, खात्याचे संचालक डॉ. नितीन रायकर उपस्थित होते.
मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, अग्नी जोखीम भत्ता ही योजना जवानांच्या धोकादायक सेवेला प्रोत्साहन देणारी असून, त्यांच्या कल्याणासाठी महत्त्वाची आहे. राज्य अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा विभागाने वर्षभरात उल्लेखनीय कामगिरी केली असून एकूण 44 कोटी रुपयांहून अधिक किमतीची मालमत्ता आणि 403 नागरिकांचे प्राण वाचविले.
शहिदांना आदरांजली वाहिल्यानंतर ध्वजारोहण केले. अग्निशमन दलाच्या जवानांच्या संचलनाची पाहणी करत मानवंदना स्वीकारली. मुख्यमंत्री डॉ.सावंत म्हणाले, राज्यात केंद्र सरकारच्या मदतीने एकूण अकरा चक्रीवादळ निवार्यांसह आपत्कालीन सेवा सुविधा उभारल्या आहेत. गोवा अशा प्रकारचे देशातील पहिले राज्य ठरले आहे. आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने ही मोठी उपलब्धी आहे.
या क्षेत्रात राज्य सरकारने उभारलेल्या साधन-सुविधा आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या असून देशातील अन्य राज्यांचे जवान गोव्यात प्रशिक्षण घेत आहेत. कार्यक्रमात त्यांनी अधिकारी, जवान व इतर मान्यवरांनी विभागाच्या कामगिरीचे कौतुक केले. गोव्यातील आपत्कालीन सेवा यंत्रणा अधिक, सक्षम व तत्पर करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. यावेळी अग्नी सुरक्षा प्रात्यक्षिके झाली. आणि जवानांना गौरविण्यात आले. या दिनानिमित्ताने घेण्यात आलेल्या पोस्टर्स स्पर्धेतील विजेत्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली.