

पणजी : पुढारी वृत्तसेवा
केंद्र सरकारने सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांच्या वर्गीकरणासाठी तयार केलेल्या गुंतवणूक आणि वार्षिक उलाढालीच्या मर्यादेत वाढ केली आहे. १ एप्रिल २०२५ पासून लागू झालेल्या या सुधारणांची माहिती राज्य सरकारच्या उद्योग खात्याने प्रसिद्धीस दिलेली आहे.
२१ मार्च २०२५ रोजी यासंदर्भातील अधिसूचना केंद्र सरकारच्या सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालयाने जारी केलेली होती. त्याअनुषंगाने, उद्योगांचे वर्गीकरण करताना यंत्रसामग्री आणि उपकरणांमधील गुंतवणूक तसेच वार्षिक उलाढाल या दोन्ही निकषांमध्ये बदल करण्यात आले आहेत.
सूक्ष्म उद्योग : गुंतवणूक अडीच कोटी रुपयांपर्यंत आणि वार्षिक उलाढाल १० कोटींपर्यंत.
लघू उद्योग : गुंतवणूक २५ कोटी रुपयांपर्यंत आणि वार्षिक उलाढाल १०० कोटींपर्यंत.
मध्यम उद्योग : गुंतवणूक १२५ कोटी रुपयांपर्यंत आणि वार्षिक उलाढाल ५०० कोटींपर्यंत.
यापूर्वी सूक्ष्म उद्योगांसाठी गुंतवणुकीची मर्यादा एक कोटी रुपये, तर वार्षिक उलाढालीची मर्यादा पाच कोटी रुपयांपर्यंत होती.