

पणजी : गोव्याची माणसे अतिशय प्रेमळ आहेत. येथील माणसांचा आपलेपणा मनाला भावतो. गोव्यातील मासेही मला खूप आवडतात, अशा शब्दांत मराठी अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी गोव्याविषयीचे आपले प्रेम व्यक्त केले. ५७व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (इफ्फी) निमित्ताने गोव्यात आलेल्या मृणाल कुलकर्णी यांनी चित्रपट, मराठी चित्रपटसृष्टी आणि चित्रपट महोत्सवांविषयी आपले विचार मांडले.
मृणाल कुलकर्णी म्हणाल्या, केवळ चित्रपट आहे, म्हणून इफ्फीला येणे हे कारण नाही. यावर्षी मी सिने रसिक म्हणून इफ्फीला आले आहे. चित्रपट महोत्सव हे केवळ चित्रपट पाहण्याचे व्यासपीठ नसून विविध भाषांतील चित्रपट, त्यांची मांडणी आणि वेगवेगळ्या संस्कृती समजून घेण्याची संधी देणारे माध्यम आहे. अशा महोत्सवांमुळे कलाकार, दिग्दर्शक आणि चित्रपटप्रेमींना एकत्र येता येते. नव्या पिढीतील कलाकारांना अशा व्यासपीठांमधून विविध प्रकारच्या चित्रपटांचा परिचय होतो. प्रत्येक चित्रपट पाहताना यातील भूमिका आपणच करावी, अशी भावना मनात निर्माण होते.
कुलकर्णी म्हणाल्या, यावर्षीचे इफ्फीचे आयोजन अतिशय सुंदररित्या करण्यात आले आहे. नवीन पिढी इफ्फीचा एक भाग होत आहे, हे पाहून खरोखरच आनंद होतो. मराठी चित्रपटसृष्टीतही नव्या विषयांवर आणि वेगळ्या आशयावर आधारित चित्रपटांची निर्मिती होत आहे. बदलत्या काळानुसार चित्रपटांची भाषा, मांडणी आणि सादरीकरणात बदल होत असले, तरी चांगली कथा आणि मानवी भावभावना यांचे महत्त्व कायम राहते. चित्रपट हे मनोरंजनाबरोबरच समाजातील नाती, भावना आणि वास्तव मांडण्याचे प्रभावी माध्यम आहे.
इफ्फीच्या निमित्ताने गोव्यात विविध भाषांतील चित्रपट आणि चित्रपट क्षेत्रातील मान्यवर एकत्र आले आहेत. अशा महोत्सवामुळे मराठी चित्रपटांनाही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळण्याची संधी उपलब्ध होते, असेही त्या म्हणाल्या.