

पणजी : पुढारी वृत्तसेवा
गोव्यातील हजारो कुळ शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळावा, अशी महत्त्वपूर्ण मागणी खासदार सदानंद शेट तानावडे यांनी राज्यसभेत केली. विशेष उल्लेख सूचनेद्वारे त्यांनी हा विषय केंद्र सरकारच्या निदर्शनास आणून दिला. सदानंद तानावडे खासदार तानावडे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील 'पीएम किसान' योजनेने देशभरातील शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती घडवून आणली आहे.
मात्र, जमिनीच्या मालकी हक्काच्या तांत्रिक अटीमुळे गोव्यातील बहुतांश शेतकरी या लाभापासून वंचित राहत आहेत. गोव्यात सुमारे ५२ हजार कसणारे शेतकरी आहेत. परंतु जमिनीची मालकी नसल्यामुळे सध्या केवळ ६ हजार शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ मिळत आहे,
असेही त्यांनी सांगितले. गोवा कृषी कूळ कायदा १९६४ नुसार, कुळ शेतकऱ्यांना मालकांइतकेच शेतीचे अधिकार असून त्यांना मानीव मालक मानले जाते.
गोव्यात २० हजारांहून अधिक शेतकरी कूळ किंवा त्यांच्या वारसदार असल्याची माहितीही तानावडे यांनी संसदेच्या निदर्शनास आणून दिली. म्हणून नोंदणीकृत गोव्यातील ८० टक्क्यांहून अधिक शेतकरी हे अल्प आणि अत्यल्प भूधारक आहेत.
वर्षाला मिळणारी ६ हजार रुपयांची मदत त्यांना बी-बियाणे आणि इतर खर्चासाठी अत्यंत मोलाची ठरेल. गोव्यातील शेती केवळ अन्नसुरक्षेसाठीच नाही, तर राज्याच्या निसर्गसौंदर्यासाठी आणि पर्यायाने पर्यटनासाठीही महत्त्वाची असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.