Vasco Municipality | मुरगाव पालिकेतील लिफ्ट ठरतेय डोकेदुखी; दिव्यांग व वृद्ध नागरिकांची मोठी गैरसोय
मुरगाव पालिका कार्यालयातील लिफ्ट वारंवार नादुरुस्त
दिव्यांग व वृद्ध नागरिकांची मोठी गैरसोय
लिफ्टमध्ये अडकण्याच्या भीतीने नागरिकांचा वापर टाळण्याकडे कल
वारंवार बिघाडाचे कारण अस्पष्ट, प्रशासन मौन
लिफ्ट ‘शोभेची वस्तू’ ठरत असल्याची नागरिकांची टीका
वास्को : पुढारी वृत्तसेवा
मुरगाव पालिका कार्यालयात महत्त्वाच्या कामासाठी येणाऱ्या दिव्यांग, वृद्ध व्यक्तीसाठी व इतरांसाठी असलेली लिफ्ट बऱ्याच दिवसांपासून नादुरुस्त आहे. दिव्यांग, वृद्ध तसेच इतर आजारी नागरिकांनी जिन्याच्या पायऱ्यांवरून येऊ नयेत यासाठी खास लिफ्टची सोय करण्यात आली आहे.
या लिफ्टची सोय केल्याबद्दल दिव्यांग, वृध्द व्यक्तींनी समाधान व्यक्त केले होते. लिफ्टचा शुभारंभ झाल्यावर गेल्या ७-८ महिन्यांतून बंद पडत असे. या लिफ्टसंबंधी पालिकेने निर्णय घेण्याची गरज आहे.
जेणेकरून दिव्यांग, वृध्द व्यक्तींची गैरसोय दूर होईल. पालिका प्रशासकीय इमारतीचे नूतनीकरण करताना काही बदल केले होते. पूर्वी या इमारतीमध्ये उपजिल्हाधिकारी, मामलेदार, नागरी पुरवठा व इतर कार्यालये तळमजल्यावर होती. तर पालिकेचे कार्यालय व विविध विभाग पहिल्या मजल्यावर होते. त्यामुळे पालिका कार्यालयात येणाऱ्यांना सुमारे ३०-३५ पायऱ्या चढून यावे लागत होते.
यामध्ये दिव्यांग, वृध्द व्यक्तींचे मोठे हाल होत असे. त्यामुळेया इमारतीमध्ये लिफ्ट असावी अशी मागणी करण्यात येत होती. या इमारतीच्या नूतनीकरणाचे काम हाती घेताना तेथे लिफ्टची सोय करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार एका बाजूला लिफ्ट सुविधा करण्यात आली आहे.
धोका पत्करण्यापेक्षा पायऱ्याच बऱ्या
लिफ्ट वरखाली जाताना मध्येच अचानक मध्येच बंद कधी पडेल हे सांगता येत नाही. त्यामुळे त्यातील व्यक्तींचा जीव टांगणीला लागतो. काहीजणांनी या लिफ्टचा धसका घेतला आहे. लिफ्टमधून जावून जीव धोक्यात घालण्याऐवजी थोडा त्रास सहन करून पायऱ्यांवरून ये-जा करण्याचे काहीजण पसंत करीत आहेत. सदर लिफ्ट वारंवार का बिघडते यासंबंधी कोणीच काही सांगण्यास तयार नाही. त्यामुळे सदर नवीन लिफ्ट एक शोभेची वस्तू बनली आहे. कदाचित काही दिवसांनी त्या लिफ्टचा वापर रद्दी, टाकाऊ वस्तू ठेवण्यासाठी करण्यात येऊ लागला, तर आश्चर्य वाटू नये.

