

दाबोळी, (पुढारी वृत्तसेवा):
मुरगाव हार्बर राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूूस संरक्षण भिंत उभारण्यासाठी आणलेल्या सिमेंटच्या कॉक्रिट ट्रकच्या मागील चाकाच्या खाली सापडून एका पादचारी महिलेचा जागीच मृत्यू झाला. अपघात घडल्याचे कॉक्रिट वाहन चालकांच्या लक्षात येताच तो घटनास्थळावरून पसार झाला. मात्र काही वेळातच त्याला अटक करण्यात आली.
पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून त्या महिलेचा मृतदेह दाबोळी चिखली उपजिल्हा रुग्णालयात पाठवून दिला. मुरगाव हार्बर येथे राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. यासाठी संरक्षण भिंत कॉक्रिटपासून बांधण्यासाठी सिमेंट कॉक्रिट वाहनांची ये-जा सुरू असते. बुधवारी (दि. ११) सकाळी ११ वाजता एक महिला आपले काम करून हार्बर मार्गे सडा येथे जात असताना तिथेच सुरू असलेल्या संरक्षण भिंत उभारण्याच्या सिमेंट कॉक्रिटच्या वाहनांची (गे २७एन ३४०३) धडक लागते.
वाहनाची धडक लागताच ती कॉक्रिट वाहनाच्या मागच्या चाकाखाली आल्याने तिचा जागीच मृत्यू होतो. ती महिला ठार झाल्याचे वाहन चालकाच्या लक्षात येताच त्याने घटनास्थळावरून पळ काढला होता. हार्बर रस्त्यावर अपघातात एका महिलेचा मृत्यू झाल्याचे कळताच मुरगाव पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक साईदत नाईक आपल्या इतर पोलिसांना घेऊन घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी अपघाताचा पंचनामा करून मृतदेह चिखली उपजिल्हा रुग्णालयात पाठवला. नंतर मृतदेह उत्तर तपासणीसाठी मडगाव जिल्हा इस्पितळात पाठवून दिला आहे. अपघातात मृत्यू झालेली महिलेचे नाव श्रीदेवी रेड्डी (४५) असून ती मुरगाव सडा भागात राहत असल्याचे माहिती प्राप्त झाली आहे. तसंच ती हार्बर कस्टम कार्यालयात आपले काम करून घराकडे जात असताना तिचा अपघातात मृत्यू झाला. मुरगाव पोलीस अपघात प्रकरणी पुढील तपास करत आहेत.
मुरगाव ते हार्बर मार्गावर रस्ता रुंदीकरण व संरक्षण भिंत उभारण्याच्या कामात आतापर्यंत दोघांचा अपघाती मृत्यू झाला आहे. संरक्षण भिंत उभारण्याचे काम करणारे ठेकेदार आपले काम योग्यरित्या करत नसल्याने हार्बर मार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. हे काम सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत सुरू आहे. दोन्ही अपघातावेळी एकही अधिकारी घटनास्थळी उपस्थित नव्हते, अशी माहिती येथे उपस्थित असलेल्यांनी दिली आहे.