

पणजी: औदुंबर शिंदे देशभरात तसेच गोवा राज्यातील मासळी बाजारात 'मोरी' मासा दुर्मीळ होत चालला आहे. मोरी हा मासा नसून प्राणी आहे, हे कोणाला खरे वाटणार नाही. सरकारने आता मोरी ही लुप्तप्राय प्रजाती म्हणून घोषित करावी, अशी मागणी या माशावर संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या अहवालातून केली आहे.
'मोरी' माशाचे आंबट-तिखट म्हटले की, तोंडाला हमखास पाणी सुटते. मोरी मटणाची चव चाखायची असेल, तर फक्त गोवा आणि कोकणातच.त्यातल्या त्यात मालवणी मोरी रस्सा न्याराच. सुकी बनवलेली मोरी तर औषधचं असल्याचे मानले जाते. हरियाना येथील अशोका विद्यापीठातील एका संशोधनानुसार, भारतात मोरी मासा सर्वाधिक प्रमाणात गोव्यातच खाल्ला जातो. तो मासा गोव्यातील अधिकतम हॉटेलमध्ये मिळतोय पण मोठ्या प्रमाणात विदेशांत निर्यातही होतो.
संशोधन अहवालात म्हटले आहे की, मोरी मासा सगळ्यात जास्त गोव्यात खाल्ला जातो. या माशाला गोव्यात पसंती असणाऱ्यांची संख्या ३५.८ टक्के आहे, तर तामिळनाडूमध्ये ३५.६ टक्के आहे. महाराष्ट्रात तर फक्त कोकणात सर्वात अधिक पसंती असून, महाराष्ट्रातील एकूण टक्केवारी ४.६. एवढी आहे.
हरियाना येथील अशोका विद्यापीतातील 'एन्व्हायर्नमेंटल स्टडीज' विभागाच्या विद्यार्थ्यांनी स्टडी टूर अंतर्गत गुजरात, कोकण, गोवा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, ओडिशा व पश्चिम बंगाल या राज्यांचा दौरा केला तेव्हा त्यांनी प्रत्येक राज्यातील मोरी माशांवर संशोधन केले.प्रत्येक राज्यातील मोरीचे खाण्यातील पदार्थ व हॉटेलमधील उपलब्धता तपासली. तेव्हा गोव्यात बहुतांश हॉटेलमध्ये ऑर्डर देताच शिजवलेले मोरी मटण, शाकोती लगेच मिळते पूर्वसचना दिली तरच तामिळनाडूसारख्या राज्यात मोरी डीश तयार केली जाते
अशोका विद्यापीठातील विभागप्रमुख डॉ. दिव्या कर्नाद व एनड्रू डायस यांच्या मार्गदर्शनाखाली एस. नारायणी शृती कोट्टिलील, सुधा कोट्टिलील, अलिशा बर्नीस या विद्यार्थ्यांनी हे संशोधन केले. तामिळनाडू येथील 'इंटर डिसिप्लिनरी सेंटर फॉर कंझर्वेशन' या विभागाच्या प्रमुख त्रिशा गुता यांचीही त्यांनी या उपक्रमासाठी मदत घेतली. स्थानिक नागरिक मोरीवर ताव मारतातच त्याहीपेक्षा विशेषतः रशियन आणि इस्रायली पर्यटक मोरी खाण्यासाठी गोव्यात मुद्दामहून येतात, असे त्यांना आढळून आले आहे.