पणजी : पुढारी वृत्तसेवा गोवा कस्टम्सच्या एअर इंटेलिजन्स युनिटने मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर बँकॉकहून ताश्कंद मार्गे आलेल्या प्रवाशाविरुद्ध मोठी कारवाई करत सुमारे ९.०३६ किलो हायड्रोपोनिक गांजा (कॅनॅबिस) जप्त केला.
या अमलीपदार्थाची आंतरराष्ट्रीय काळ्या बाजारातील अंदाजे किंमत ३ कोटी १६ लाख २६ हजार रुपये इतकी असल्याचे कस्टम्स अधिकाऱ्यांनी सांगितले. बँकॉकहून ताश्कंद मार्गे गोव्यात आलेल्या एका प्रवाशाबाबत मिळालेल्या ठोस गुप्त माहितीनुसार कस्टम अधिकाऱ्यांनी त्याला आगमनावेळी अडवून तपासणी केली. तपासादरम्यान प्रवाशाच्या चेक-इन बॅगेजमध्ये कपड्यांच्या खाली लपवून ठेवलेला हायड्रोपोनिक गांजा आढळून आला.
एनडीपीएस फिल्ड टेस्टिंग किटद्वारे तपासणी केल्यानंतर हा पदार्थ अमलीपदार्थ असल्याची पुष्टी झाली. जप्त केलेला ९.०३६ किलो गांजा ताब्यात घेण्यात आला असून संबंधित अंमलीपदार्थविषयक कायद्याखाली अटक करण्यात आली आहे. प्रवाशाला या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती गोवा कस्टम्स विभागाचे आयुक्त सुनील भीमराव देशमुख यांनी दिली.