Goa Monsoon Food Culture Fish | पावसात खवय्यांसाठी चढणीच्या माशांची पर्वणी

Goa Monsoon Food Culture Fish | मान्सून पूर्ण सक्रिय झाल्याने लहान मुले, युवकांत आनंदाचे वातावरण
खानिवडे, ठाणे
बाजारात सध्या खाडी आणि ओहळांतील वलग्नीच्या म्हणजेच चढणीच्या माशांचा पर्याय उभा राहिला आहे.Pudhari News Network
Published on
Updated on

केरी : पुढारी वृत्तसेवा

पावसाचा जोर वाढताच सत्तरी तालुक्यातील नद्या, ओहोळ, धबधबे आणि शेतांमध्ये चढणीच्या माशांची हालचाल सुरू झाली असून, मासेप्रेमींसाठी ही खरी पर्वणी ठरत आहे. दरवर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वरच्या भागाकडे जाणाऱ्या या माशांना पकडण्यासाठी सायंकाळपासून रात्री उशिरापर्यंत तरुणांसह अनेक मासेप्रेमी विविध ठिकाणी गर्दी करत आहेत.

खानिवडे, ठाणे
Khalapur Paddy Sowing Delay: लहरी हवामानामुळे भातशेतीचे नियोजन बिघडले; बळीराजा चिंतेत

केरी, केळावडे, शिरोली, हद्द, साठयेचा धबधबा तसेच पर्ये, सांखळी परिसरातील ओहोळ आणि जलप्रवाहांमध्ये मोठ्या प्रमाणात चढणीचे मासे मिळत आहेत. पाण्याचा प्रवाह वाढल्यानंतर हे मासे नैसर्गिकरित्या वरच्या भागाकडे स्थलांतर करतात. याच काळात त्यांना पकडण्यासाठी स्थानिक नागरिक पारंपरिक पद्धतींसह आधुनिक साधनांचाही वापर करत आहेत.

पूर्वी रात्रीच्या वेळी मासेमारीसाठी पेट्रोमॅक्सच्या दिव्यांचा वापर केला जात असे. बदलत्या काळानुसार आता त्याची जागा एलईडी बॅटरी, रिचार्जेबल दिवे आणि हेडलाईट टॉर्च यांनी घेतली आहे. त्यामुळे रात्रीच्या अंधारातही मासेमारी करणे अधिक सोयीचे झाले आहे. अनेक जण हातात दिवे आणि मासेमारीचे साहित्य घेऊन ओहोळांच्या काठावर दिसत आहेत.

चढणीचे मासे पकडण्यासाठी काही जण 'शेणुल' (पारंपरिक जाळे) वापरतात, तर काहीजण मोठ्या सुरीच्या साहाय्याने किंवा केवळ हातानेच मासे पकडतात. पूर्वी अनेक ठिकाणी मासे अडवण्यासाठी पाण्यात दगड-मातीचा छोटा बांध घालून 'पाळणे' करण्याची परंपरा होती.

त्यासाठी विशिष्ट जागांवर 'खूण' ही लावली जात असे. काही ठिकाणी 'दोबके' लावत असत. आजही काही गावांमध्ये ही पारंपरिक पद्धत जपली जात आहे. सत्तरीतील अनेकांसाठी चढणीच्या माशांची मासेमारी ही केवळ उदरनिर्वाहाची किंवा खाद्यसंस्कृतीची बाब नसून ती एक परंपरा, छंद आणि पावसाळ्यातील आनंदाचा अविभाज्य भाग आहे.

खानिवडे, ठाणे
Monsoon Arrival 2026 | बळीराजाला दिलासा

काही जण हे मासे खात नसले तरी मित्रमंडळींसह मासे पकडण्याचा रोमांच अनुभवण्यासाठी आवर्जून जातात. "रिकाम्या हाताने परतायचे नाही," अशी भावना अनेक मासेप्रेमींमध्ये दिसून येते. चढणीच्या माशांचे कालवण, तळलेले मासे आणि पारंपरिक मसाल्यात तयार केलेले पदार्थ गोमंतकीय खाद्यसंस्कृतीत विशेष मानाचे मानले जातात.

सत्तरीतील नागरिक आनंदात

निसर्गाने हिरवाईची चादर पांघरलेल्या सत्तरीत पावसाळ्याच्या सरी, खळाळणारे ओहोळ, धबधब्यांचा नाद आणि चढणीच्या माशांची लगबग यामुळे एक वेगळीच उत्साहवर्धक वातावरणनिर्मिती झाली आहे. या निसर्गरम्य वातावरणात ताजे चढणीचे मासे पकडण्याचा आणि त्यांच्या आगळ्यावेगळ्या चवीचा आस्वाद घेण्याचा आनंद सध्या सत्तरीतील नागरिक आणि मासेप्रेमी मनमुराद लुटताना दिसत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news