

पणजी : गोवा विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या शून्य तासात मांद्रेचे मगो पक्षाचे आमदार जीत आरोलकर यांनी मराठी भाषेलाही राजभाषेचा दर्जा देण्याची मागणी केली. गोव्यातील धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनात मराठीचे स्थान महत्त्वाचे असून, राज्य सरकारने याला मान्यता द्यावी, अशी आग्रही भूमिका त्यांनी मांडली.
आमदार आरोलकर म्हणाले, गोव्यातील अनेक मंदिरे, धार्मिक ग्रंथ, सांस्कृतिक परंपरा या मराठी भाषेशी निगडित आहेत. लोकसहभागाने वापरली जाणारी ही भाषा अजूनही राजकीय मान्यतेपासून वंचित आहे. कोकणीसह मराठीलाही राजभाषेचा दर्जा देऊन तिचा सन्मान राखावा. मात्र, या मागणीवर आमदार विजय सरदेसाई आणि विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी आक्षेप घेतला.
सरदेसाई म्हणाले, विधीमंडळात झालेल्या कायद्याच्या विरोधात असा मुद्दा उपस्थित करता येणार नाही. मराठीचा आदर आम्हालाही आहे, पण भाषाविषयक मुद्द्यांवर अशा तर्हेने चर्चा होणे योग्य नाही. युरी आलेमाव यांनीही शून्य तासाचा वापर अशा संवेदनशील विषयांसाठी करणे योग्य नसल्याचे मत मांडले. यावर वीज मंत्री सुदिन ढवळीकर यांनी आमदार आरोलकर यांनी मांडलेला मुद्दा योग्य असल्याचे सांगितले. या गोंधळात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हस्तक्षेप करत स्पष्टीकरण दिले की शून्य तासामध्ये आमदार कुठलाही मुद्दा उपस्थित करू शकतात. मराठीचा उल्लेख केल्यामुळे नियमभंग झालेला नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले. महत्त्वाचे म्हणजे गोवा मराठी राजभाषा निर्धार समितीने विधानसभेतील 29 आमदार व मंत्र्यांना राजभाषेसंदर्भात निवेदन दिले होते. मात्र त्यातील मगोचे दोन आमदार वगळता इतर कुणीही मराठी राजभाषेच्या विषयाला समर्थन दिले नाही. अपक्ष असलेले डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनीही पाठिंबा दिला नाही.
आमदार आरोलकर यांनी आपली मागणी मांडताना सांगितले की मराठी ही गोव्याची सांस्कृतिक भाषा आहे. गोव्याची भाषा आहे. सर्व व्यावहार अनेक वर्षांपासून मराठीतच चालू होते. त्यामुळे मराठीचे महत्त्व अबाधित असून, मराठीला दुसरी राजभाषा म्हणून स्थान मिळावे, अशी मागणी आरोलकर यांनी केली. त्यावर विजय सरदेसाई हे आक्षेप घेऊ लागल्यामुळे नाराज झालेले आरोलकर म्हणाले, तुम्हाला तुमच्या बातम्या मराठीतून प्रसिद्धीस देता, मराठी वर्तमानपत्रे वाचता, गोव्यात भजन, सांस्कृतिक कार्यक्रम सर्वकाही मराठीत होते, ते तुम्हाला चालते, मात्र मराठी राजभाषा का नको, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यावेळी मंत्री ढवळीकर यांनी जोरदार बाक वाजवले.